इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची वन-डे मालिका गमावल्यानंतर भारत आणि कसोटी मालिकेसाठी तयार झाला आहे. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पाठीला झालेली दुखापत भारताला चांगलीच महागात पडू शकते. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने अशी चिंता व्यक्त केली आहे.

“भुवनेश्वरला झालेली दुखापत भारताला खरचं महागात पडू शकते. मला इंग्लंड दौऱ्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये भुवनेश्वरने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, ती पाहता इंग्लंडमध्ये त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा केलीच जाईल. त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची ताकद असल्यामुळे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत तो संघात असणं अत्यंत गरजेचं होतं.” सचिन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

याचसोबत भुवनेश्वरची अखेरच्या फळीतली फलंदाजी आपल्याला विसरुन चालता येणार नाही. २०१४ साली झालेल्या मालिकेत भुवनेश्वरने चांगली फलंदाजी केली होती. भुवनेश्वर अखेरच्या फळीत भागीदारी रचण्याची ताकद असलेला फलंदाज आहे. याचसोबत इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर हे गोलंदाजही तितकेच अनुभवी असल्यामुळे या गोलंदाजांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचं सचिन म्हणाला.

Story img Loader