Asia Cup 2022 : यूएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या सामना होता. दोन्ही संघाचे आशिया चषकातील आव्हान सुंपुष्टात आले असल्याने हा सामना केवळ औपचारीकता म्हणून खेळवण्यात आला. दरम्यान, या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा अर्धा संघ गारद झाला. भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत ५ गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
हेही वाचा – विजयापेक्षा विराटचे शतक मोठे! अफगाणिस्तानचा लाजीरवाणा पराभव, कोहलीच्या फलंदाजीमुळे भारतीय सुखावले
भुवनेश्वर कुमारने ४ षटके टाकत अफगाणिस्तानचे ५ गडी बाद केले. भुवनेश्वरने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हजरतुल्ला झझईला एलबीडब्लू केले. तर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वरने गुरबाजला त्रिफळाचित केले. तिसऱ्या षटकात चौथ्या चेंडूवर एका बाहेर जाणाऱ्या चेंडूवर करीम जनतने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटला कट लागल्याने पहिल्या स्लीपमध्ये विराट कोहलीने त्याचा झेल घेतला. तर शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वरने नजीबुल्लाला एलबीडब्लू आऊट करत आपला चौथा बळी घेतला. तर ७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अझमातुल्लाला बाद करत भुवनेश्वरने पाचवा बळी घेतला.
दरम्यान, भारताने पहिले फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शतकीय आणि के एल राहुलच्या अर्थशतकीय खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानसमोर २१३ धावांचे लक्ष ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ १११ धावांपर्यंतच मजल मारू शकला.