बॉल टॅम्परिंग प्रकरणात बंदीची शिक्षा भोगत असलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी-२० स्पर्धा बिगबॅश लीगमध्ये दोन्ही खेळाडूंना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. बिगबॅश लीगचे संचालक किम मॅकोनी यांनी ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट हे खेळाडू बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले होते. यानंतर स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षाच्या बंदीची तर बँक्रॉफ्टला ९ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

महत्वाची गोष्ट म्हणजे, मध्यंतरीच्या काळात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन्ही खेळाडूंना कॅनडातील ग्लोबल टी-२० स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हिरवा कंदील दिल्याशिवाय दोघांनाही बिगबॅश स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार नाही असं मॅकोनी यांनी म्हटलं आहे. काही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्मिथ-वॉर्नवरची बंदीची शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या भूमिकावर ठाम राहिली आहे. २०१८-१९ सालची बिगबॅश लीग डिसेंबर महिन्यात सुरु होणार आहे.