विंदू दारा सिंग नावाच्या व्यक्तीची पहिली आणि प्राधान्याने दिली जाणारी ओळख म्हणजे ‘कुस्तीवीर आणि अभिनेता दारा सिंग यांचा मुलगा’ ही! याव्यतिरिक्त विंदूला स्वत:ची अशी ओळख नव्हती. दारा सिंग यांनी पहिलेवहिले ‘अॅक्शन हिरो’ म्हणून नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या नावावर नायक म्हणून आणि मग चरित्र अभिनेता म्हणून अनेक चित्रपट आहेत. विंदूनेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो कधीच यशस्वी ठरला नाही. २००९च्या ‘बिग बॉस सीझन-३’मध्ये विजेता झाल्यानंतर त्याला खरी प्रसिद्धी मिळाली.
विंदू दारा सिंग याने ‘जय वीर हनुमान’ या मालिकेत हनुमानाची भूमिका केली होती. याशिवाय ‘जाल’, ‘श्श..कोई है’सारख्या मालिका याचप्रमाणे ‘गर्व’, ‘पार्टनर’ अगदी नुकत्याच प्रसिध्द झालेल्या ‘सन ऑफ सरदार’पर्यंत अनेक चित्रपटांत विंदूने लहानमोठय़ा भूमिका केल्या आहेत. त्याने ‘मास्टर शेफ ’, ‘कॉमेडी सर्कस’सारख्या रिअॅलिटी शोमध्येही काम केले. ‘बिग बॉस सीझन-३’ मध्ये विंदूचा स्पर्धक म्हणून प्रवेश झाला आणि त्याच्या शोमधील वागणुकीमुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांकडून ‘बडे दिलवाला’ म्हणून ओळखही मिळाली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या विजेतेपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर विनोदी, सहाय्यक अभिनेता म्हणून त्याच्याकडे अनेक हिंदी चित्रपटांची कामेही येऊ लागली. या सगळ्याच्या परिणामी विंदू दारा सिंग हे नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. याच प्रसिध्दीमुळे त्याला ‘सन ऑफ सरदार’, ‘हाऊसफुल्ल-२’, ‘लायन ऑफ पंजाब’ असे अनेक चित्रपटही मिळाले. परंतु त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत एक चांगला अभिनेता म्हणून कीर्ती मिळवता आली नाही. आता आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील विंदूच्या सहभागाने त्याचा उरलासुरला लौकिकही तो गमावून बसला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा