स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराट टी-२० संघाचे कप्तानपद सोडले. त्यानंतर बीसीसीआयने विराटला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवले. रोहित शर्माला टी-२० आणि वनडे संघाची कमान सोपवण्यात आली.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याने ही कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विराटऐवजी केएल राहुलला या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बनवण्यात आले. पण विराटची अनुपस्थिती भारताला महागात पडली आणि त्यांनी हा सामना गमावला. आता विराटनंतर कोणाकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाची कमान सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – IND vs SA : हे वागणं बरं नव्हं..! विराटचं कृत्य पाहून गौतम गंभीर भडकला; म्हणाला, “असा कॅप्टन…”
आज शनिवारी संध्याकाळी विराटने ट्विटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. एक संदेश देताना त्याने संघाच्या कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले. कोहलीने लिहिले, “सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.”
३३ वर्षीय विराट कोहलीने २०१४ मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ९९ सामने खेळले असून ७९६२ धावा केल्या आहेत. यातील ६८ सामन्यांमध्ये विराटने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि या कालावधीत एकूण ५८६४ धावा केल्या.
कसोटी कर्णधार म्हणून विराट आणि टीम इंडिया...
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. २०१५-१६ हंगामात भारताने श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत केले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. २०१६ मध्येच, भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि त्यानंतर देशांतर्गत हंगामात सलग १३ कसोटी सामने जिंकले. त्या मोसमात भारताने सलग ४ कसोटी मालिका जिंकल्या. त्यांचा एकमेव पराभव ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात झाला. त्यानंतर २०१७-१८ च्या मोसमात भारताने श्रीलंकेवर पाठोपाठ विजय मिळवल मालिका जिंकली. २०१८ साली भारताने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून मालिका गमावली, पण नंतर जोरदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करणारा विराट पहिला आशियाई कर्णधार बनला.