जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी दोन दिवसीय लिलावाला आज सुरुवात झाली. आजच्या पहिल्या दिवशी १६१ खेळाडूंवर बोली लागत आहे. पहिल्या काही तासांमध्ये लागलेल्या बोलीमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने मोठी खरेदी करत मुंबईकर श्रेयस अय्यरला आपल्या संघात स्थान दिलं आहे. श्रेयस अय्यर हा यंदाच्या आयपीएल लिलावामधील पहिला खेळाडू ठरलाय ज्याला दहा कोटींहून अधिकची बोली लावत विकत घेण्यात आलंय. कोलकाता संघाने सव्वा बारा कोटींना श्रेयसला आपल्या संघात घेतलंय. श्रेयसकडे कोलकात्याचा संघ संभाव्य कर्णधार म्हणून पाहत असून त्याच दृष्टीने ही मोठी खरेदी झाल्याचं बोललं जातंय.
बॉलिवूडचा बादशाह किंग खान म्हणजेच शाहरुख खान सहमालक असणाऱ्या कोलकात्याच्या संघाने तब्बल १२ कोटी २५ लाखांना अय्यरला संघात घेतले. अय्यरसाठी अन्य दोन संघांनीही बोली लावली होती. सर्वात आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही बोली लावली होती. मात्र काहीही करुन अय्यरला संघात घ्यायचं याच हेतूने कोलकात्याने अतिरिक्त बोली लावत अय्यरला संघात घेतलं. विशेष म्हणजे श्रेयसची बेस प्राइज केवळ दोन कोटी इतकी होती. म्हणजेच बेस प्राइजच्या सहा पटींहून अधिक किंमत श्रेयसला लिलावात मिळालीय.
श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार राहिला आहे. त्याने २०२० मध्ये संघाला आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्येही पोचवलं. मात्र २०२१ च्या पर्वात तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यावेळी ऋषभ पंतकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. मात्र नंतरही पंतकडेच संघाचं नेतृत्व राहिल्याने अय्यरने दिल्लीच्या संघाला सोडचिठ्ठी दिली.
नक्की वाचा >> IPL Auction 2022: गब्बरची जब्बर कमाई… चौपट अधिक किंमत मिळत ठरला लिलाव झालेला पहिला खेळाडू
श्रेयस अय्यरची टी-२० मधील कामगिरी उत्तम राहिलीय. १५६ डावांमध्ये त्याने चार हजारांहून अधिक धावा केल्यात. यात २ शतकं आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. ज्या पद्धतीने श्रेयसवर बोली लागली आणि त्याची कामगिरी आहे त्यानुसार काही वर्षांमध्ये तो भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही असं त्याचे चाहते सोशल नेटवर्किंगवर म्हणत या मोठ्या बोलीसाठी त्याचं अभिनंदन करताना दिसतायत.
आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत. बंगळुरू येथे आज आणि उद्या रंगणाऱ्या या लिलावामध्ये १५ देशांचे ६०० खेळाडू सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी १६१ खेळाडूंवर बोली लागणार आहे. लिलावाआधी १० संघांनी ३३ खेळाडूंना रिटेन केलं आहे. प्रत्येक संघाला किमान १८ तर सर्वाधिक २५ खेळाडू संघात घेण्याची मूभा आहे. यंदा लिलावामध्ये प्रत्येक संघाला खेळाडूंवर ९० कोटी रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून दिलीय. या लिलावामध्ये खेळाडूंवर ९०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.