भारत आणि श्रीलंका अंतिम फेरीत भिडणार
अखेरच्या दोन्ही साखळी सामन्यांमध्ये विजय मिळवत भारताने तिरंगी स्पर्धेची सर्व समीकरणे पालटवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांना श्रीलंकेशी दोन हात करावे लागणार आहे. अखेरच्या साखळी सामन्यात दणदणीत विजय मिळव्याने भारतीय संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल, त्याचबरोबर अंतिम सामन्यात जायबंदी महेंद्रसिंग धोनीची खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने तो खेळल्यास भारतीय संघ अधिक सक्षम होऊ शकतो. तर दुसरीकडे पराभवाचे उट्टे काढून विजेतेपद पटकावण्यासाठी श्रीलंकेचा संघही उत्सुक असेल. त्यामुळे अंतिम फेरीत भारत लंकादहन करून जेतेपदाला गवसणी घालतो की श्रीलंका तिरंगी मालिकेवर कब्जा करते, यावर साऱ्यांच्याच नजरा असतील.
गेल्या सामन्यात श्रीलंकेवर भारताने सर्व आघाडय़ांवर मात केली होती. फलंदाजीमध्ये रोहित शर्माला चांगला सूर गवसल्याचे पाहायला मिळाले आहे. पण त्याचा सहकारी सलामीवीर शिखर धवनला मात्र अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नावावर या स्पर्धेत एक शतक असेल तरी त्याच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळालेले नाही. दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनीही अजून लय सापडलेली दिसत नाही. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार चांगल्या फॉर्मात दिसत आहे. त्याने जर विकेट्स मिळवल्या तर भारताला चांगली सुरुवात करता येईल. उमेश यादव आणि ईशांत शर्मा या दोन्ही वेगवान गोलंदाजांना अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जडेजाने फलंदाजीत चमक दाखवलेली नसली तरी गोलंदाजीमध्ये तो प्रभावी ठरलेला आहे. पण त्याचा सहकारी ‘ऑफ स्पिनर’ आर. अश्विन मात्र अजूनही फॉर्मशी झगडत आहे. पोटऱ्यांची नस दुखावलेला महेंद्रसिंग धोनी अंतिम फेरी खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तो जर खेळला तर भारतीय संघ नक्कीच अधिक सक्षम होईल आणि संघाला बळकटी मिळेल. पण त्याच्या समावेशाबद्दल नाणेफेकीपूर्वी निर्णय घेण्यात येणार आहे.
श्रीलंकेच्या संघाचा विचार केला तर त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. भारताविरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यामध्ये दोनशे धावांची सलामी महेला जयवर्धने आणि उपुल थरंगा यांनी दिली होती, भारताविरुद्धच्या दुसऱ्या साखळी सामन्यात त्यांचे काहीही चालले नाही. कुमार संगकारा चांगली फलंदााी करताना दिसत असला तरी त्याला कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. मध्यला फळीमध्ये संगकारा आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा अपवाद वगळता अन्य कोणाकडेही जास्त अनुभव नाही.ोोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगा हा त्यांचा हुकमी एक्का असला तरी त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. फिरकीपटू रंगना हेराथ मात्र चांगल्या फॉर्मात आहे.
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, मोहम्मद सामी, सुरेश रैना, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, विनय कुमार, उमेश यादव.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्सूज (कर्णधार), कुसल परेरा, उपूल थरंगा, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, महेला जयवर्धने, जीवन मेंडिस, अजंठा मेंडिस, दिनेश चंडिमल, न्यूवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, सचित्र सेनानायके, रंगना हेराथ, दिलहारा लोक्युहेटिगे, शमिंडा ईरंगा.
सामन्याची वेळ : रात्री ७ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट आणि डीडी नॅशनलवर

Story img Loader