KL Rahul and Jasprit Bumrah Comeback: विश्वचषक २०२३ सुरू होण्यास १०० दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक असताना, टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत मोठे आणि सकारात्मक अपडेट्स समोर आले आहेत. विश्वचषक संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक, जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर सध्या एन.सी.ए.मध्ये भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सराव करत आहेत. बुमराह आणि राहुलबद्दल बातमी अशी आहे की हे दोन्ही खेळाडू आशिया कप २०२३च्या माध्यमातून भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन करू शकतात.
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत साशंकता असताना २०२३च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी त्याला थोडा वेळ मिळेल. मात्र विश्वचषकापर्यंत तो तंदुरुस्त असेल असे बोलले जात आहे पण खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआय सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनला आपले राखीव खेळाडू म्हणून तयार करत आहे.
जसप्रीत बुमराहचा एन.सी.ए.मध्ये सराव सुरु
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, या वर्षी मार्चमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झालेल्या जसप्रीत बुमराहने एनसीएमध्ये गोलंदाजीचा सराव करण्यास सुरू केली आहे. त्याला आतापर्यंत त्यात कोणतीही अडचण आली नाही पण एन.सी.ए.च्या काही सराव सामन्यात तो सहभाग घेणार असून त्यानंतरच त्याच्या फिटनेसबाबत आपण नेमकं सांगू शकतो. मात्र, भारताच्या आयर्लंड दौऱ्यापर्यंत तो सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल असेही बोलले जात आहे.
टीम इंडियाचे व्यवस्थापन २०२३च्या विश्वचषकाचा विचार करून कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाही आणि बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ देऊ इच्छित आहे. यामुळे भारतीय चाहते बुमराहला आशिया कप २०२३मध्येच पुनरागमन करताना पाहू शकतात. माहितीसाठी! मागच्या वर्षी पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहने सप्टेंबरपासून एकही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामना खेळलेला नाही.
भारताचा स्टार फलंदाज के.एल. राहुल आशिया चषकात खेळू शकतो
अशीच परिस्थिती के.एल. राहुलची आहे. मे महिन्यात आयपीएल २०२३ दरम्यान त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेनंतर त्याने एन.सी.ए. मध्ये शारीरिक प्रशिक्षणही सुरू केले आहे. राहुलची रिकव्हरी वेळापत्रकानुसार सुरू राहिल्यास तोही आयर्लंड दौऱ्यापर्यंत खेळण्यासाठी तंदुरुस्त होऊ शकतो. पण या स्टार खेळाडूबाबत बीसीसीआय कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही.
माहितीसाठी! जेव्हापासून के.एल. राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिका बजावली आहे, तेव्हापासून तो संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याने अनेक प्रसंगी डाव हाताळण्याबरोबरच फिनिशरची उत्तम भूमिका बजावली आहे. विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन टीम इंडियाचे व्यवस्थापन के.एल. राहुलला संघात घेण्याचा कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
श्रेयस अय्यरबाबत अनिश्चितता
आता फक्त अनिश्चितता श्रेयस अय्यरच्या बाबतीत आहे, ज्याच्या पाठीवर एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाली. राहुल आणि बुमराहसोबत अय्यरही सध्या एन.सी.ए.मध्ये आहे. अय्यर सध्या एनसीएमध्ये फिजिओथेरपी घेत आहेत आणि जर त्यांच्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, त्यांना कौशल्य प्रशिक्षण सुरू होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. अशा स्थितीत विश्वचषकात त्याच्या पुनरागमनाबद्दल अनिश्चितता आहे.
माहितीसाठी, हा २८ वर्षीय फलंदाज काही काळ क्रमांक-४ वर शानदार फलंदाजी करत होता. श्रीलंकेविरुद्धच्या होम सिरीजदरम्यान त्याला दुखापत झाली होती. यानंतर तो काही मालिकांसाठी बाहेर पडला, पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याने पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अय्यरला पुन्हा दुखापत झाली आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. विश्वचषकापर्यंत अय्यर जर पुनरागमन करू शकला नाही तर त्याच्या जागी संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना चौथ्या क्रमांकासाठी तयार केले जात आहे.