पहिल्या सामन्यात लाजिरवाणी हार आणि दुसऱ्या सामन्यात धमाकेदार विजय यानंतर तिसऱ्या कसोटी भारतीय संघाकडून झुंजार खेळीचं दर्शन घडलं. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताच्या हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरला आणि सामना वाचवला. या अनिर्णित सामन्याबरोबरच भारताने कसोटी मालिकेतील १-१ ही बरोबरी कायम राखली. भारतीय संघाने या दमदार कामगिरीच्या बळावर एक नवा पराक्रमदेखील केला.
#TeamIndia have pulled off the most remarkable DRAW!
The series stands at 1-1
Scorecard – https://t.co/tqS209srjN #AUSvIND pic.twitter.com/2zkWGJZtZG
— BCCI (@BCCI) January 11, 2021
आणखी वाचा- “पंत भला तो सब भला”; तडाखेबाज खेळीनंतर ऋषभवर क्रिकेट विश्वातून कौतुकाचा वर्षाव
भारतीय संघाने कसोटीच्या चौथ्या डावात १३१ षटकं खेळून काढली. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल १८ वर्षांनंतर भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात १०० पेक्षा जास्त षटकं खेळण्याची किमया साधली. या आधी २००२ साली भारतीय संघ लॉर्ड्सच्या मैदानावर खेळत होता. तेव्हा भारतीय संघाने कसोटीच्या चौथ्या डावात तब्बल १०९.३ षटकं खेळली होती. त्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने शतक ठोकलं होते. त्याच्या खेळीच्या जोरावरच भारताने ३९७ धावांपर्यंत मजल मारली होती.
फोटो सौजन्य – सोनी टेन
Video: “हीच का तुमची खिलाडूवृत्ती?”; स्मिथने ड्रिंक्स ब्रेकमध्ये केलेल्या कृतीवर नेटीझन्स भडकले…
सामन्यात प्रथम ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत ३३८ धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात झटपट धावा करत भारताला विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक केलं. शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेला फारशी चमक दाखवता आली नाही. पण पंतने धुवाधार ९७ धावा कुटल्या. पुजारानेही ७७ धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यावर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी कमाल केली. या दोघांनी सामना वाचवण्यासाठी तब्बल २५९ चेंडू म्हणजेच ४३ षटकं खेळून काढली आणि त्यात नाबाद ६२ धावांची भागीदारी केली.