India tour of South Africa 1st ODI: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव विसरून टीम इंडिया एक नवी सुरुवात करणार आहे. कर्णधार के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, रविवारी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वन डेने नव्याने सुरुवात करू इच्छित आहे. भारताच्या अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघ गेल्या पाच वर्षांपासून घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका जिंकू शकलेला नाही. यापूर्वी भारताने २०१७ /१८ मध्ये सहा सामन्यांची मालिका ५-१ अशी जिंकली होती. यजमान संघाने २०२१/२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकून भारताचा मानहानीकारक पराभव केला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाईल. त्याच वेळी, नाणेफेक याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी १.०० वाजता होईल.

युवा खेळाडूंना उत्तम संधी

आता पुढील वर्षी टी-२० विश्वचषक होणार आहे, त्यामुळे वन डे मालिकेच्या प्राधान्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु २०२५मध्ये होणार्‍या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही केवळ भारतासाठीच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेसाठी सुद्धा मोठी संधी असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी गेल्या दीड दशकात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे.

ऋतुराज तंदुरुस्त होणार की रजत पाटीदार खेळणार?

या परिस्थितीत, तीन सामन्यांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करणार्‍या के.एल. राहुलवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाईल. त्याने याआधी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, मात्र या मालिकेत यश मिळाल्यास त्याला दीर्घ कालावधीसाठी एकदिवसीय संघाची कमान दिली जाऊ शकते. आजारपणामुळे टी-२० मालिकेत खेळू न शकलेल्या ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंनी यापूर्वी आपले कौशल्य दाखवले आहे, परंतु इतर काही खेळाडू आपली क्षमता दाखवण्यासाठी उत्सुक असतील. ऋतुराज याची प्रकृती कशी आहे, हे पाहणे बाकी आहे. जर तो तंदुरुस्त असेल तर तो खेळणार हे निश्चित, अन्यथा रजत पाटीदारलाही पदार्पणाची संधी मिळू शकते.

रिंकूला मिळू शकते पदार्पणाची संधी, सुदर्शन खेळणार?

रिंकू सिंगचाही या खेळाडूंमध्ये समावेश आहे ज्याने यावर्षी टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली होती. संघ व्यवस्थापन त्याला ५० षटकांच्या फॉरमॅटमध्येही आजमावू इच्छित आहे आणि त्यामुळे या डावखुऱ्या फलंदाजाला वन डेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. रजत पाटीदारलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे साई सुदर्शन आणि तिलक वर्मा यांनाही मधल्या फळीत स्थान मिळू शकते. कागिसो रबाडा आणि ऑनरिक नॉर्खिया यांच्या अनुपस्थितीमुळे कमजोर ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणाविरुद्ध हे खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापनाला असेल.

महत्त्वाचे वेगवान गोलंदाज खेळणार नाहीत

एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांशिवाय भारतही या मालिकेत प्रवेश करेल. बुमराह आणि सिराज कसोटी मालिकेत खेळतील पण शमीला फिटनेसबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मेडिकल टीमकडून मान्यता मिळालेली नाही. या प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारताची जबाबदारी आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल. दीपक चाहर मालिकेतून बाहेर आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात यामागील कारण ‘फॅमिली मेडिकल इमर्जन्सी’ असे संबोधले होते. त्याच्या जागी आकाश दीपचा संघात समावेश करण्यात आला आहे. कसोटीच्या तयारीसाठी श्रेयस अय्यर दुसऱ्या आणि तिसऱ्या वन डेतून माघार घेणार आहे.

चहल निवडकर्त्यांना प्रभावित करू इच्छितो

भारत वॉशिंग्टन सुंदरलाही संधी देऊ शकतो जो टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजाची भूमिकाही बजावू शकतो. चहलला संधी मिळाल्यास तो निवडकर्त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करेल. ३३ वर्षीय लेगस्पिनर चहलचा वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नव्हता. राहुलच्या उपस्थितीत संजू सॅमसनला राखीव यष्टीरक्षक म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. या मोसमात त्याच्याकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष करण्यात आले होते, परंतु येथे त्याला फलंदाज म्हणून संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: IPL 2024: रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्स मध्ये जाणार का? पत्नी रितिकाच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण

दक्षिण आफ्रिकेच्या संघाची स्थिती

टेम्बा बावुमा, मार्को जॅनसेन, गेराल्ड कोएत्झी आणि कागिसो रबाडा यांची संघातील अनुपस्थिती इतरांसाठी संधी खुली करेल. डावखुरा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने गुरुवारी तिसर्‍या टी-२० सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले आणि त्याला एकदिवसीय मालिकेत कॅप मिळेल, हे निश्चित मानले जात आहे. दक्षिण आफ्रिका आपले दोन्ही फिरकीपटू निवडते की केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांच्यापैकी एकाला बाकावर बसावे लागेल, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग११

भारत: के.एल. राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ऋतुराज गायकवाड/रजत पाटीदार, साई सुदर्शन/संजू सॅमसन, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जोर्जी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, विआन मुल्डर, नांद्रे बर्गर, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लिझाद विल्यम्स.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big update from kl rahul told whether sanju samson will get a chance in ind vs sa odi series or not avw
Show comments