पीटीआय, नवी दिल्ली : माजी अष्टपैलू आणि १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. १८ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडेल.
गेल्या आठवडय़ाभरात ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे ३६वे अध्यक्ष म्हणून बिन्नी यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांची ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी फेरनिवड होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मंडळातही गांगुलीऐवजी शहा ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘‘जय शहा यांनी ‘आयसीसी’मध्ये ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधी म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आगामी ‘आयसीसी’ संचालक मंडळाच्या बैठकीत योग्य व्यक्तीने भारताचे प्रतिनिधित्व करणे गरजेचे आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ६७ वर्षीय बिन्नी यांनी अध्यक्षपदासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (११ ऑक्टोबर) व बुधवारचा (१२ ऑक्टोबर) दिवस देण्यात आला आहे. बुधवारी अन्य कोणीही अर्ज न भरल्यास बिन्नी यांची ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल. १८ ऑक्टोबरला मुंबई येथे होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिन्नी अधिकृतरीत्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील.
तसेच ‘बीसीसीआय’मधील अन्य मुख्य पदासांठी राजीव शुक्ला (उपाध्यक्ष), देवजित सैकिया (सहसचिव) आणि आशीष शेलार (कोषाध्यक्ष) हे उमेदवार आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुणसिंग धुमाळ हे सध्या ‘बीसीसीआय’मध्ये कोषाध्यक्षपद भूषवत आहेत. मात्र आता धुमाळ यांची इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अध्यक्ष म्हणून निवड होणे अपेक्षित असून ते ब्रिजेश पटेल यांची जागा घेतील.
गांगुलीकडून ‘आयपीएल’ अध्यक्षपदासाठी नकार
‘बीसीसीआय’चा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा हे पद भूषवण्यासाठी उत्सुक होता. मात्र गेल्या आठवडय़ात दिल्ली येथे झालेल्या बैठकांमध्ये गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच ‘बीसीसीआय’मध्ये अध्यक्ष म्हणून सलग दोन कार्यकाळ भूषवण्याची प्रथा नसल्याचेही गांगुलीला सांगण्यात आले. गांगुलीला ‘आयपीएल’चे अध्यक्षपद भूषवण्याबाबत विचारणा झाली होती, पण त्याने हे पद स्वीकारण्यास नकार दिला. ‘‘सौरवने ‘आयपीएल’चे अध्यक्षपद भूषवण्यास नम्रपणे नकार दिला. ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवल्यानंतर याच संस्थेतील एका उपसमितीचे अध्यक्ष म्हणून काम करणे योग्य नसल्याचे गांगुलीचे म्हणणे आहे. त्याची पुन्हा ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवण्याची इच्छा होती,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.
आशीष शेलार कोषाध्यक्षपदासाठी दावेदार
मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी सोमवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेलार यांना पाठिंबाही दिला. मात्र शेलार ‘बीसीसीआय’च्या कोषाध्यक्षपदासाठी उमेदवार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. अन्य कोणीही कोषाध्यक्षपदासाठी अर्ज न केल्यास शेलार यांची या पदावर बिनविरोध निवड होईल. मात्र त्यांना ‘एमसीए’च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचा ‘एमसीए’चे अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा मार्ग सुकर होईल.