टीम इंडियाचा २०११ विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविणारा ‘युवी’ आज ३२ वर्षांचा झाला. या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर, जिद्दीवर बरेच जण फिदा आहेत. नुसत्या क्रिकेटच्या मैदानात नाही, तर दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीने युवराज जीवनाच्या रणांगणात अपराजित ठरला आहे. कर्करोगावर मात करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करणे यातूनच युवराजची लढवय्या वृत्ती आपल्याला बरेच काही देऊन जाते. युवराजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील आपल्याला जाणून घेण्यास आवडतील अशा काही महत्वाच्या गोष्टी..
१. क्रिकेटमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱया युवराजला लहानपणी मात्र, क्रिकेटची आवडच नव्हती किंवा मोठेपणी आपण उत्कृष्ट क्रिकेटपटू व्हाव असाही त्याने कधी विचार केला नाही. युवीला लहानपणी टेनिस आणि स्केटिंगची आवड होती. इतकेच नाही, युवीने १४ वर्षाखालील राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे अंजिक्यपदही पटाकावले होते. टेनिस आणि स्केटिंगमध्ये युवी निपुण खेळाडू होता. केवळ वडिल योगराज सिंह यांच्या हट्टपायी युवराज क्रिकेटपटू व्हायला लागले. मुख्यम्हणजे, युवराज आत्ताही हे मोठ्या मनाने स्विकारतो आणि क्रिकेटपटू होण्याचे संपूर्ण श्रेय तो आपल्या वडिलांना देतो.
२. युवराज लहान असताना काही कौटुंबिक कारणास्तव युवीच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचे ठरविले. घटस्फोटानंतर युवराजने आपल्या आईकडे राहण्याचे ठरविले होते.
३. लहानपणी खेळाबरोबर अभिनयाचीही चुणूक युवीमध्ये होती. ‘मेहंदी सजादी’ या टेलिव्हिजन कार्यक्रमातही लहान असताना युवराजने काही काळाकरिता अभिनय केला होता.
४. १४ जानेवारी २०११ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जोहान्सबर्गच्या सामन्याच्या सकाळीच युराजला कफ झाल्याचे जाणवले. त्या वेळी त्याची एक बाजू पूर्ण निकामी झाल्याचे वाटले होते. युवीच्या मनात तेव्हाच शंका आली होती. परंतु, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकात खेळण्यासाठी त्याने कोणतीही वैद्यकीय चाचणी त्यावेळी करून घेतली नाही. विश्वचषक जिंकल्यानंतर युवीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले आणि दुसऱया दिवशी त्याने वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या.
५. युवराजला लहानपणापासून व्हिडिओ गेम्स खेळण्याचे भरपूर वेड होते आणि आजही आहे. कॅन्सरवरील उपचारा दरम्यान, केमोथेरपीनंतर तब्बल १० दिवस त्याला चालता येत नव्हते. मैदानात चित्त्याच्या चपळाईने पळणाऱ्या युवराजला ‘व्हिलचेअर’वर चालताना अश्रू अनावर झाले होते. हे वडिलांनी पाहताच त्यांचा धीर खचू नये म्हणून, युवीने तुम्ही मला व्हिडिओ गेम पण खेळू देत नाही. यासाठी मी रडतोय असे कारण सांगितले. मला माझा व्हिडिओ गेम आणून द्या असा हट्ट युवीने केला होता.
संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती बाळगणाऱया अशा या ‘युवा’ क्रिकेटपटू ‘युवराज’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
लढवय्या युवीची प्रेरक खेळी !
युवराजला भेटण्याचे धैर्य नव्हते – सचिन