मैदानात उत्तुंग षटकारांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकणाऱ्या सिक्सर किंग युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. युवराजने आज ३७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. युवराज सध्या भारतीय संघाचा अविभाज्य घटक नाही. मात्र, तो आपल्या जिवाची पर्वा न करता भारतीय संघासाठी लढला. २०११ च्या विश्वचषकादरम्यान कॅन्सर झाला असतानाही त्याने मैदान सोडले नाही. तो खेळला आणि त्याने जिंकले.. असेच काही युवराज सिंगच्या बाबतीत म्हणता येईल. २०११ आणि २००७ च्या विश्वचषकात भारताच्या विजयात युवीचा मोलाचा वाटा होता.
आपल्या नजाकतभऱ्या आणि आक्रमक फलंदाजीने जगभरातील क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधून घेतले. भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव घ्यायलाा हरकत नाही. २०११ सालचा विश्वचषक भारताला जिंकून देण्यात युवीच्या सातत्यपूर्ण फलंदाजीचा खूप मोठा वाटा होता. गेली अनेक वर्षे या डावखुऱ्या फलंदाजाने भारतीय संघाच्या मधल्या फळीची धुरा समर्थपणे सांभाळली. मात्र, विश्वचषकानंतर युवराज सिंगला झालेले कॅन्सरचे निदान अनेक क्रिकेटरसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे ठरले.
मैदानावर खंबीरपणे उभे राहून भारतीय संघाला वेळोवेळी सावरणाऱ्या युवीने वैयक्तिक जीवनातही कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाचा कणखरपणे सामना करून अनेकांपुढे नवा आदर्श निर्माण केला. कॅन्सरवर मात करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करणे यातूनच युवराजची लढवय्या वृत्ती आपल्याला बरेच काही देऊन जाते. युवीची मैदानावरील आणि वैयक्तिक जीवनातील ‘इनिंग’ यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहील. युवराज आपल्या नावाप्रमाणे खेळला आणि जगला. असा युवराज होणे नाही असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. युवराज मैदानावर असल्यास आपण सामना जिंकणार हे प्रत्येक भारतीयांना माहित. युवराजने अनेक महत्वाच्या खेळी केल्या. गोलंदाजी, फलंदाजीसह क्षेत्ररक्षणात आपले १०० टक्के योगदान दिले.