मैदानात उत्तुंग षटकारांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकणाऱ्या सिक्सर किंग युवराज सिंगचा आज ३७ वा वाढदिवस आहे. आपल्या नजाकतभऱ्या आणि आक्रमक फलंदाजीने जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव घ्यायलाा हरकत नाही. २०११ आणि २००७ सालचा विश्वचषक भारताला जिंकून देण्यात युवीच्या सातत्यपूर्ण फलंदाजीचा खूप मोठा वाटा होता. या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर, जिद्दीवर बरेच जण फिदा आहेत. नुसत्या क्रिकेटच्या मैदानात नाही, तर युवराज जीवनाच्या रणांगणात अपराजित ठरला आहे. कर्करोगावर मात करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करणे यातूनच युवराजची लढवय्या वृत्ती दिसते. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी..
षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या युवराजला लहानपणी मात्र, क्रिकेटची आवडच नव्हती किंवा मोठेपणी आपण उत्कृष्ट क्रिकेटपटू व्हाव असाही त्याने कधी विचार केला नाही. युवीला लहानपणी टेनिस आणि स्केटिंगची आवड होती. इतकेच नाही, युवीने १४ वर्षाखालील राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे अंजिक्यपदही पटाकावले होते. टेनिस आणि स्केटिंगमध्ये युवी निपुण खेळाडू होता. केवळ वडिल योगराज सिंह यांच्या हट्टपायी युवराजला क्रिकेटपटू व्हायला लागले. मुख्यम्हणजे, युवराज आत्ताही हे मोठ्या मनाने स्विकारतो आणि क्रिकेटपटू होण्याचे संपूर्ण श्रेय तो आपल्या वडिलांना देतो.
युवराज लहान असताना काही कौटुंबिक कारणास्तव युवीच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचे ठरविले. घटस्फोटानंतर युवराजने आपल्या आईकडे राहण्याचे ठरविले होते.
(आणखी वाचा : Birthday Special : असा ‘युवराज’ पुन्हा होणे नाही)
लहानपणी खेळाबरोबर अभिनयाचीही चुणूक युवीमध्ये होती. ‘मेहंदी सजादी’ या टेलिव्हिजन कार्यक्रमातही लहान असताना युवराजने काही काळाकरिता अभिनय केला होता.
युवराजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ ऑक्टोबर २००० रोजी केनिया विरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले. तर कसोटी पदार्पण १६ ऑक्टोबर २००३ रोजी केले. २००५ मधील इंडियन ऑइल कप युवराजसाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर युवराज भारतीय संघाचा अविभाज्य घटक राहिला.
२००५ साली क्रिकइन्फो (cricinfo) या वेबसाईट अनुसार १९९९नंतर युवराजने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना सर्वाधिक धावबाद केले.
१४ जानेवारी २०११ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जोहान्सबर्गच्या सामन्याच्या सकाळीच युराजला कफ झाल्याचे जाणवले. त्या वेळी त्याची एक बाजू पूर्ण निकामी झाल्याचे वाटले होते. युवीच्या मनात तेव्हाच शंका आली होती. परंतु, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकात खेळण्यासाठी त्याने कोणतीही वैद्यकीय चाचणी करून घेतली नाही. विश्वचषक जिंकल्यानंतर युवीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले आणि दुसऱया दिवशी त्याने वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या.
युवराजला लहानपणापासून व्हिडिओ गेम्स खेळण्याचे भरपूर वेड होते आणि आजही आहे. कॅन्सरवरील उपचारा दरम्यान, केमोथेरपीनंतर तब्बल १० दिवस त्याला चालता येत नव्हते. मैदानात चित्त्याच्या चपळाईने पळणाऱ्या युवराजला ‘व्हिलचेअर’वर चालताना अश्रू अनावर झाले होते. हे वडिलांनी पाहताच त्यांचा धीर खचू नये म्हणून, युवीने तुम्ही मला व्हिडिओ गेम पण खेळू देत नाही. यासाठी मी रडतोय असे कारण सांगितले. मला माझा व्हिडिओ गेम आणून द्या असा हट्ट युवीने केला होता.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते २०१२ मध्ये युवराजला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २०१४ मध्ये युवराजला “पद्मश्री” पुरस्कार देऊन गौरवन्यात आले.