भारताचे महान फिरकीपटू व माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं नुकतंच दीर्घकालीन आजारामुळे निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. बिशन सिंग बेदी यांनी आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय फिरकीची जादू अवघ्या जगात पोहोचवण्यापासून भारताला पहिला वहिला एकदिवसीय सामना जिंकून देण्यापर्यंत तेव्हा अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक गोष्टी वास्तवात उतरवून दाखवल्या आहेत. निवृत्तीनंतरही बिशन सिंग बेदी यांनी अनेक नवोदित फिरकीपटूंना घडवण्यात मोठी कामगिरी बजावली आहे. अशाच एका नवोदित फिरकीपटूशी झालेला एक संवाद बेदींनी एका यूट्यूब चॅलवर दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. हा फिरकीपटू होता जगविख्यात शेन वॉर्न!
बिशन सिंग बेदी यांनी ओकट्री स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या ‘विशेष’ भेटीचा किस्सा सांगितला होता. २०२६ साली ही मुलाखत प्रसिद्ध झाली होती. यावेळी बिशन सिंग बेदी यांना त्यांच्यामते सर्वोत्कृष्ट तीन फिरकीपटू कोण? अशी विचारणा केली असता त्यांनी तीन अपेक्षित नावं घेतली. इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन! मात्र, त्यापुढे जाऊन भारताव्यतिरिक्त इतर देशांमधील एका खेळाडूचं नाव त्यांनी घेतलं. तो खेळाडू म्हणजे शेन वॉर्न! शेन वॉर्ननं स्वत: अनेकदा सचिन तेंडुलकर आपल्याला स्वप्नातही दिसायचा, असा उल्लेख केला आहे. त्याचा संदर्भ देत बिशन सिंग बेदी यांनी हा किस्सा सांगितला होता.
भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन
बिशन सिंग बेदी – शेन वॉर्न यांची ‘ती’ भेट!
दोन महान फिरकीपटूंची ही भेटही तितकीच हटके झाली यात शंका नाही. या भेटीमध्ये विषय होता अर्थात सचिन तेंडुलकरचा! बिशन सिंग बेदी या मुलाखतीत म्हणाले, “माझ्यासोबत शेन वॉर्नची एक मीटिंग झाली. त्यानं मला विचारलं, ‘बिशनजी, तुम्ही सचिन तेंडुलकरला कसं आऊट कराल?’ त्याच्या डोक्यात सचिनच बसला होता. त्याला रात्री झोप लागायची नाही. त्यानं हे स्वीकारलंही आहे. मी त्याला म्हटलं, ‘कोणत्याही महान माणसाची मानसिकता समजून घ्यायचं एक तत्व आहे. त्याची महानताच त्याचा वीकनेस असतो’. आता मला माहिती नव्हतं की तो फार काही शिकलेला नाही. मी जे बोललो ते त्याच्या डोक्यावरून गेलं”, असं म्हणत बिशन सिंग बेदींनी या मुलाखतीत आपण शेन वॉर्नला काय सल्ला दिला हेही सांगितलं.
“मी म्हटलं ऐक… पुढच्या वेळी जेव्हा तू त्याला बॉलिंग टाकशील तेव्हा एक स्लिप, एक गली आणि एक फॉरवर्ड शॉर्ट लेग ठेव. तो म्हणाला ‘तुम्ही मस्करी करताय ना?’ मी म्हटलं अजिबात नाही. हे फिल्डर त्याला आऊट करण्यासाठी नाहीयेत. त्याचा कॅच पकडण्यासाठीही नाहीत. ते त्याच्या मानसिकतेवर काम करण्यासाठी आहेत. तो एक महान खेळाडू आहे. त्याला त्याच्या एकदम जवळ झेल घेण्यासाठी उभे केलेले खेळाडू आवडणार नाहीत”, असं म्हणत बिशन सिंग बेदींनी शेन वॉर्नला दिलेला सल्ला सांगितला.
बिशन सिंग बेदींना जेव्हा कोटला स्टेडियमवर प्रवेश नाकारण्यात आला होता
“…तेव्हा शेन वॉर्न माझ्याकडे बघून हातातली कॅप हलवत होता!”
“तुम्ही वाईट बॉलिंगसाठी फिल्डिंग सेट करत नाही. तुम्ही चांगल्या बॉलिंगसाठी फिल्डिंग सेट करता. जर कुणी चांगल्या फॉर्ममध्ये फटकावतच असेल, तर चांगल्या बॉलिंगचाही फायदा होत नाही. मग त्याचा सरळ मनानं स्वीकार करा. पण तुम्ही त्याला घाबरून फिल्डर थेट सीमारेषेजवळ उभे करणं परवडणार नाही. मग मी त्याला सांगितलं जमल्यास एक सिली मिडऑफही ठेव. त्याच्या डोक्यात बहुतेक तेच बसलं. त्यानं तो प्रयत्न केला. त्या फिल्डिंगवर त्यानं सचिनला गलीकरवी झेलबाद केलं. त्या मॅचला मी प्रेस बॉक्समध्ये बसलो होतो. सचिनची विकेट घेतल्यानंतर तो माझ्याकडे बघून कॅप हातात घेऊन हलवत होता”, अशा शब्दांत बिशन सिंग बेदींनी सचिनला कशी बॉलिंग टाकायची? याचं मार्गदर्शन केल्याचा किस्सा सांगितला!