शरद कद्रेकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
भारताचे कर्णधार बिशन सिंग बेदी हे नेहमीच परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. बेदी आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना यांच्यात नेहमीच वाद असे. दिल्ली क्रिकेट संघटनेत अंतर्गत बंडाळ्या होत्या. २००१च्या बेतात बिशन सिंग बेदी आणि यशपाल शर्मा अशा दोन माजी खेळाडूंची एकाचवेळी कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली. बेदी नेहमीप्रमाणे दिल्ली संघाचं मुख्य मैदान असलेल्या कोटला स्टेडियमवर पोहोचले. बेदी दुसऱ्या गटातर्फे नियुक्त कोच असल्याने त्यांना कोटलावर प्रवेश नाकारण्यात आला. बेदी भारतीय संघाचे माजी कर्णधार होते. भारताच्या सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. तरीही त्यांना अशी वागणूक देण्यात आली. सुनील गावस्कर यांना मुंबईत अशी वागणूक देण्यात आली असती तर गहजब झाला असता. पण बेदी यांना घरच्या मैदानावर अशी वागणूक मिळाली.
१९७६ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन लिव्हरने ७ विकेट्स पटकावत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. जॉन लिव्हरने डोक्याला व्हॅसलिन लावलेलं. त्याने डोक्याला पट्टी लावलेली. त्या सामन्यात रुबेन नावाचे मुंबईचे अंपायर होते. ते पोलीसखात्यात ठसातज्ज्ञ होते. लिव्हर गोलंदाजी करत असताना पडलेली एक पट्टी त्यांनी पट्टी खिशात ठेवली. व्हॅलसिनमुळे चेंडू स्विंग होत होता. बेदी यांनी त्याला आक्षेप घेतला. बोर्डाने तो बॉल लॉर्ड्सला पाठवला. केमिकल अॅनालायझरकडे. बेदी यांनी बीसीसीआयला सुनावलं की भारतात केमिकल अॅनालयझर नाही का? पण बीसीसीआयने तो चेंडू पाठवला. बेदी याप्रकाराने वैतागले. व्हॅसलिनच्या पट्ट्या सापडूनही लिव्हरवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यावेळी बीसीसीआयने व्हॅसलिन वापराचे पुरावे असतानाही कर्णधार बेदी यांना पाठिंबा दिला नाही.
याच मालिकेत बेदी यांनी लिव्हर आणि बॉब विलीस यांच्यावर चेंडू कुरतडल्याचा अर्थात बॉल टेंपरिंगचा आरोप केला होता. इंग्लंडने ती मालिका जिंकली होती. पण त्यांच्या खेळात काहीतरी संशयास्पद असल्याचा बेदी यांना वाटत होतं. इंग्लंड संघाने हे आरोप फेटाळून लावले. या मालिकेत कार्यरत पंच रुबेन यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं की आम्हाला व्हॅसलिनची पट्टी सापडली होती. इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेगने ती पट्टी व्हॅसलिनची असल्याचं सांगितलं होतं. रुबेन यांनी सांगितलं की असं घडायला नको होतं. पण आम्ही फार काही करु शकलो नाही. बेदी यांच्या सजगपणामुळे बॉल टेपरिंगसारखं काही असतं हे आम्हाला समजलं.
तो काळ बेदी यांच्यासाठी कठीण होता. ते इंग्लंडमध्ये नॉर्दटम्पनशायरसाठी खेळायचे. या प्रकारामुळे नॉर्दटम्पटनशायरने बेदींशी असलेला करार रद्द केला. यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं.
१९७४मध्ये बेदीने इंग्लंडमध्ये मुलाखत दिली. बीसीसीआयने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. नियम मोडून मीडियाशी बोलल्याबद्दल ही कारवाई होती. बेदी यांना एक टेस्ट वगळण्यात आलं. ही टेस्ट मॅच भारत हरलं. वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट होती. पद्माकर शिवलकर यांनाही खेळवलं नाही. बेदी पुढच्या टेस्टला संघात आले.
भाजप नेते आणि क्रिकेट प्रशासक अरुण जेटली यांचं नाव दिल्लीतल्या फिरोझशहा कोटला मैदानाला देण्यात आलं. या निर्णयाला बेदी यांचा विरोध होता. जेटली यांचं क्रिकेट प्रशासक म्हणून योगदान असेल पण ते क्रिकेटपटू नाहीत अशी बेदी यांची भूमिका होती. बेदी यांचं योगदान लक्षात घेऊन या स्टेडियमधल्या एका स्टँडला बेदी यांचं नाव देण्यात आलं आहे. स्टँडला देण्यात आलेलं माझं नाव काढून टाका नाहीतरी मी संघटनेला न्यायालयात खेचेन अशी भूमिका बेदी यांनी घेतली होती.
खेळाडूंच्या हक्कांसाठी भांडणारा असा कर्णधार होता. लीग पद्धतीची स्पर्धा अर्थात केरी पॅकरमध्ये बेदी खेळणार अशी चर्चा होती पण ते या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत. इंग्रजी समीक्षकांनी त्यांच्या गोलंदाजीचं वर्णन ‘पोएट्री इन मोशन’ असं केलं आहे.