वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकला कतार फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सॅव्हिओ रॉड्रीक्स यांनी भारत सरकारकडे एक मागणी केली आहे. भारतीय फुटबॉल असोसिएशनने कतार विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकावा असं रॉड्रीक्स म्हणाले आहेत. तसेच रॉड्रीक्स यांनी कतारमध्ये जाणाऱ्या भारतीयांनीही या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी जाऊ नये असं आवाहन रॉड्रीक्स यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> FIFA World Cup च्या पहिल्याच दिवशी अंबानींच्या Jio ला मागावी लागली माफी! चाहते म्हणाले, “तुमच्यापेक्षा ‘सोनी’ने…”; जाणून घ्या घडलं काय

फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ च्या उद्धाटन समारंभामध्ये कतारने भारतातून फरार असलेला वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकला इस्लाम या विषयावर भाषण देण्यासाठी आमंत्रित केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याचविरोधात रॉड्रीक्स यांनी एक पत्रक जारी केलं आहे. एकीकडे संपूर्ण जग दहशतवादाला तोंड देत असतानाच दुसरीकडे अशाप्रकारे झाकीर नाईकला आमंत्रित करुन दहशतवादाबद्दल सहानुभूती दाखवून द्वेष पसरवण्याचा हा हा प्रकार आहे, असं रॉड्रीक्स यांनी म्हटलं आहे.

“फिफा विश्वचषक स्पर्धा ही जागतिक स्तरावरील स्पर्धा आहे. जगभरातील चाहते ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात. तसेच कोट्यावधी लोक इंटरनेट आणि टीव्हीवरुन हे सामने पाहतात. अशा ठिकाणी झाकीर नाईकला मंच उपलब्ध करुन देणे अयोग्य आहे. जग दहशतवादाला तोंड देत असताना झाकीर नाईकला द्वेष आणि कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी मंच उलब्ध करुन देता कामा नये,” असं रॉड्रीक्स यांनी म्हटलं आहे. रॉड्रीक्स यांनी सर्व भारतीयांनी तसेच परदेशामध्ये दहशतवाला बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी आणि दहशतवाचा झळ पोहोचललेल्यांनी या स्पर्धेवर बहिष्कार टाकावा असं म्हटलं आहे. दहशतवादाविरोधात सुरु असलेल्या लढ्याच्या बाजूने उभं राहत हा बहिष्कार टाकावा असं रॉड्रीक्स म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘वन लव्ह’ आर्मबँड वापराबाबत फुटबॉल कर्णधारांना ‘फिफा’ने का रोखले? याविषयीचा नियम काय सांगतो?

इस्लामिक कट्टरतावाद आणि भारताविरुद्ध द्वेष पसरवण्यात झाकीर नाईकचा हात असल्याचा आरोप करतानाच रॉड्रीक्स यांनी, “तो एखाद्या दहशतवाद्यापेक्षा कमी नाही,” असं नाईकबद्दल म्हटलं आहे. “झाकीर नाईक हा भारतीय कायद्यानुसार फरार आहे. मनी लॉण्ड्रींगशी संबंधित गुन्हे, द्वेषपूर्ण भाषणांच्या प्रकरणामध्ये तो आरोपी आहे. तो दहशतवाद्यांची पाठराखण करतो. तो स्वत: एका दहशतवाद्यापेक्षा कमी नाही. त्याने उघडपणे ओसामा बिन लादेन सारख्या दहशतवाद्याला पाठिंबा दर्शवला होता. इस्लामिक कट्टरतावादी विचारसणी आणि भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम तो करतो,” असं रॉड्रीक्स यांनी म्हटलं आहे.

याच वर्षी मार्च महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने झाकीर नाईकने स्थापन केलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही बेकायदेशीर संस्था असल्याचं सांगत तिच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. झाकीर नाईक हा या स्पर्धेदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक भाषणं देईल असं अल अरेबिया न्यूजने फैजल अलहाजीरीच्या हवाल्याने सांगितलं आहे. कतार सरकारच्या मालकीच्या अलास या खेळासंदर्भातील वाहिनीवर सुत्रसंचालक म्हणून फैजल काम करतात.

नक्की पाहा >> Video: कोणाचं काय तर कोणाचं काय… त्यांना बिअरचीच अधिक चिंता; FIFA World Cup च्या पहिल्या मॅचमधली घोषणाबाजी चर्चेत

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने झाकीर नाईकचा या स्पर्धेमधील भाषणकर्ता म्हणून समावेश करण्यात आल्याबद्दल पत्रक जारी करुन नाराजी व्यक्त केली आहे. नाईक हा दहशतवादी कारवायांसाठी ओळखला जातो. बळजबरीने धर्मांतर करणे, आत्मघातकी हल्ल्यांचे समर्थन करणे, हिंदू, हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त विधानं करणे यासारख्या गुन्ह्यांमध्ये तो दोषी आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. गुजरात, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, झारखंड, केरळ, महाराष्ट्र आणि ओदिशामध्ये त्याच्या संस्थेमार्फत त्याने काम केल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाच्या या पत्रकात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader calls for fifa world cup boycott over invite to fugitive zakir naik scsg