गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्यात व्यग्र आहेत. अशा स्थितीतही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र, क्रिकेटकडे आपले लक्ष वळवल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने विश्वविक्रम केला आहे. पाटील यांनी ट्वीट करून बुमराहचे कौतुक केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबस्टन कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने तुफान फटकेबाजी केली. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा फटकावल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले आहे. त्यामुळे त्याच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली. बुमराहच्या कामगिरीनंतर विविध क्षेत्रातील क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा – VIDEO: क्रिकेट सोडून ‘हे’ भारतीय खेळाडू उडवत बसले चिमण्या आणि मैना!
चंद्रकांत पाटील देखील बुमराहचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. “४, ५ वाइड, ७ (नो बॉल आणि सिक्स), ४, ४, ४, ६, १…टी-२० नाही, चक्क कसोटी सामन्यामध्ये हे घडलंय. क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात महागडे षटक आज इंग्लंडमध्ये टाकले गेले. युवराज सिंगने ज्याला ६ चेंडूमध्ये ६ षटकार मारले होते, तोच स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाज होता आणि फलंदाज होता जसप्रीत बुमराह”, असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर अनेक नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. त्याच्याविरुद्ध युवराज सिंगने ६ षटकार मारले होते. आता कर्णधार जसप्रीत बुमराहने एका षटकात ३५ धावा जमा केल्या आहेत.