ते आले.. ते खेळले आणि त्यांनी जिंकले, अशाच शब्दांत घानाच्या कामगिरीचे वर्णन करावे लागेल. २००६मध्ये फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या घानाने दुसरी फेरी गाठून सर्वाची मने जिंकली. त्यानंतर २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेत या आफ्रिकन संघाची ‘काळी जादू’ पाहायला मिळाली. मातब्बर संघांना धूळ चारून घाना संघ दिमाखात उपांत्य फेरीच्या दिशेने निघाला होता. पण उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेने पेनल्टी-शूटआऊटमध्ये त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. आता उपांत्य फेरीत मजल मारणारा पहिला आफ्रिकन संघ बनण्यासाठी घाना सज्ज झाला आहे.
जर्मनीत झालेल्या २००६च्या विश्वचषक स्पर्धेत घानाने झेक प्रजासत्ताक आणि अमेरिकेवर मात करून दुसऱ्या फेरीत मजल मारली. पण ब्राझीलने त्यांना घरचा रस्ता दाखवला. मात्र या स्पर्धेत दुसरी फेरी गाठणारा घाना हा आफ्रिकेतील पहिला संघ ठरल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत घानाने कमालच केली. सर्बियावर मात करून आत्मविश्वास उंचावलेल्या घानाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बरोबरी साधली. अखेर जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले तरी गटात दुसऱ्या स्थानी मजल मारून घानाने दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत दिग्गज अमेरिकेवर सरशी साधून घानाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. असामोह ग्यानला पेनल्टी-किकवर गोल करण्यात अपयश आल्यानंतरही उपांत्यपूर्व फेरीचा सामना निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी-शूटआऊटमध्ये नाटय़ पाहायला मिळाले. अखेर उरुग्वेने ४-२ अशी बाजी मारून आगेकूच केली. अन्यथा फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा घाना हा पहिला आफ्रिकन संघ ठरला असता.
अतिशय गुणवान खेळाडू, युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण यामुळे ‘ब्लॅक स्टार’ म्हणून ओळखला जाणारा घानाचा संघ या वेळी समतोल मानला जात आहे. भक्कम मधली फळी असलेल्या घानाची मदार केव्हिन-प्रिन्स बोटेंग, सुली मुन्तारी आणि मायकेल इसियेन यांच्यावर असणार आहे. सध्या ज्युवेंट्सतर्फे फॉर्मात असणारा आणि न थकता सतत धावणारा क्वाडवो असामोह घानासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. जेम्स अपियाह यांनी २०१०मध्ये घाना संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर एक मजबूत संघ तयार केला आहे. या वेळी ते घाना संघाला कितपत यश मिळवून देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
घाना  (ग-गट)
फिफा क्रमवारीतील स्थान : ३८
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : ३ वेळा (२०१४सह)
* उपांत्यपूर्व फेरी : २०१०
* दुसरी फेरी : २००६
संभाव्य संघ
* गोलरक्षक : अॅडम क्वारासे, फताऊ दौडा, स्टीफन अॅडम्स. बचावफळी : सॅम्युअल इंकूम, डॅनियल ओपारे, हॅरिसन, जेफ्री स्कलप, जॉन बोये, जोनाथन मेनसाह, जेरी अकामिंको, रशीद सुमालिया. मधली फळी : क्वाडवो असामोहा, मायकेल इसियेन, सुली मुन्तारी, रबीऊ मोहम्मद, इमान्युएल अगेयमांग, बादू आफ्रियी, ख्रिस्तियन अत्सू, अल्बर्ट अदोमाह, आंद्रे आवू, वाकासो मुबारक, डेव्हिड टिटी अकाम. आघाडीवीर : असामोह ग्यान (कर्णधार), केव्हिन-प्रिन्स बोटेंग, मजीद वारिस, जॉर्डन आयेव.
* स्टार खेळाडू : केव्हिन-प्रिन्स बोटेंग, मायकेल इसियेन, सुली मुन्तारी.
* व्यूहरचना : ४-४-२ किंवा ४-५-१
* प्रशिक्षक : जेम्स क्वेसी अपियाह.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
उर्जा आणि वेग ही घानाची भक्कम बाजू मानली जात आहे. मधल्या फळीत त्यांच्याकडे मायकेल इसियेनसारखे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंना चेंडूवर मुक्तपणे ताबा मिळवता येणार नाही. आक्रमणात कल्पकता असल्यामुळे ख्रिस्तियन अत्सू, केव्हिन-प्रिन्स बोटेंग आणि सुली मुन्तारीसारखे आक्रमकवीर प्रतिस्पध्र्यासाठी कायम धोकादायक ठरू शकतात. या खेळाडूंपैकी एकालाही लाल कार्ड मिळाले तर त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण होऊ शकते. सांघिक खेळ ही घाना संघाची ताकद असली तरी प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळाडूंचे अहंभाव दुखावणे, ही त्यांच्यासाठी मोठी समस्या आहे. रागामुळे घानाच्या अव्वल खेळाडूंची कामगिरी चांगली होत नाही. घानाचा बचाव काहीसा कमकुवत समजला जात आहे. त्यामुळे जर्मनी, पोर्तुगाल आणि अमेरिका संघ घानाची ही कमकुवत बाजू हेरून त्यावरच हल्ले चढवू शकतात. घानाच्या बचावपटूंकडे फारसा अनुभव नाही.
अपेक्षित कामगिरी
गेल्या दोन्ही विश्वचषकात आपल्या कामगिरीचा, गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या घानासमोर या वेळी मात्र खडतर आव्हान असणार आहे. जर्मनी, पोर्तुगाल आणि अमेरिका या मातब्बर संघाचा समावेश असलेल्या आणि ‘ग्रूप ऑफ डेथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग गटात घानाची डाळ शिजणे कठीण जाणार आहे. प्रत्येक विश्वचषकात किमान उपांत्यपूर्व फेरी गाठणारा जर्मनी संघ या गटात अव्वल स्थान पटकावणार, यात शंका नाही. त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी पोर्तुगाल, घाना आणि अमेरिका यांच्यात चुरस रंगणार आहे. त्यापैकी ख्रिस्तियानो रोनाल्डो चमकला तर घाना आणि अमेरिका संघ बेचिराख होतील, हे सांगायला नको. गेल्या दोन्ही वेळेला घानाने अमेरिकेला हरवल्यामुळे त्यांच्याविरुद्ध घानाचे पारडे जड आहे. मात्र पोर्तुगालविरुद्ध घाना संघ करिश्मा दाखवतो का, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Story img Loader