जागतिक फुटबॉलप्रमुख पदावर म्हणजेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्षपद पाचव्यांदा भूषवण्यासाठी सेप ब्लाटर इच्छुक आहेत, असे वृत्त ‘ब्लिक’ या स्विस वृत्तपत्राने दिले आहे.
‘‘माझी कार्य करण्याची ऊर्मी संपलेली नाही, त्यामुळे मला अध्यक्षपदासाठी पुन्हा उत्सुकता आहे. माझे ध्येय अजून पूर्ण झालेले नाही,’’ अशी प्रतिक्रिया ७८ वर्षीय ब्लाटर यांनी व्यक्त केली आहे. झुरिच येथे झालेल्या एका कार्यक्रमात ब्लाटर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याच ठिकाणी फिफाचे मुख्यालय आहे. १९९८पासून ब्लाटर अध्यक्षपदावर विराजमान आहेत. ब्राझीलमध्ये १२ जूनपासून विश्वचषक फुटबॉल स्पध्रेला प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा महिन्याभराच्या अंतरावर आली असतानाच ब्लाटर यांनी आपली अध्यक्षपदाबाबतची उत्सुकता स्पष्ट केली आहे. ही निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. फ्रान्सचे माजी सनदी अधिकारी आणि फिफाचे माजी सेक्रेटरी जनरल जेरोम चॅम्पेग्ने हे एकमेव व्यक्ती सध्या तरी या पदासाठी उत्सुक आहेत. २०१०मध्ये जेरोम यांनी फिफा सोडले होते. परंतु ब्लाटर निवडणूक लढवत असतील, तर मी माघार घेईन, असे चॅम्पेग्ने यांनी म्हटले आहे.

Story img Loader