भारताने आफ्रिकेला ३-० असे आरामात हरविले. शेवटच्या कसोटीत आफ्रिकेने टर्निंग ट्रॅकवर चिवट फलंदाजी करून स्वत:ची गोची करून घेतली. कारण आता मोहाली आणि नागपूर कसोटीतील पराभव खराब खेळपट्यांमुळे झाले असे कारण देणे अवघड होईल. बचावाचे तंत्र अभेद्य असेल आणि खडूसपणे उभे राहिले तर अशा खेळपट्यांवर तग धरता येतो हे त्यांनीच सिद्ध करून दाखवले. या कसोटीच्या दुसऱ्या डावाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की आफ्रिकेने अक्रॉस खेळणे निग्रहाने टाळले. स्पिनर्सविरुद्ध पुल, स्वीप हे फटके मारण्याचा बिल्कुल प्रयत्न केला नाही. मोहाली आणि नागपूर सामन्यातील त्यांची फलंदाजी पाहिली तर किती फलंदाज हाराकिरी करून आउट झाले होते ते लक्षात येईल.
अश्विनने संपूर्ण मालिकेत हाय क्लास गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीकडे पाहून आता असे वाटते की त्याची परदेशात यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. हे त्याने आफ्रिकेविरुद्ध घेतलेल्या विकेट्सच्या आकड्यावर नव्हे; तर गोलंदाजीच्या दर्जावर बेतलेले मत आहे. एक तर त्याचे फ्लाइट आणि लेंथवर छान नियंत्रण आले आहे. म्हणजे एखाद्या कसदार गवयाने कधी दहाव्या मात्रे पासून, कधी अकराव्या मात्रेपासून, कधी बाराव्या मात्रेपासून लीलया तान घेऊन प्रत्येकवेळेस विनासायास समेवर यावे तसा अश्विन कधी कमी कधी जास्त फ्लाइट देऊन त्याच मुश्किल लेंथवर चेंडू टाकायला शिकला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर काही इंच हे त्याने आपले घर करून टाकले आहे. परदेशात आपल्या इतका टर्न मिळाला नाही तरी या नैपुण्यावर आणि वाढवलेल्या संयमावर त्याच्या कामगिरीत नक्की सुधारणा होईल, असे वाटते. तो बाहेर सीरिज जिंकून देऊ शकेल असे लगेच म्हणता येणार नाही. पण त्याची कामगिरी लक्षणीय होईल, असे वाटते.
या संपूर्ण मालिकेत डि’व्हिलियिर्सबद्दल भारतीय प्रेक्षकांनी दाखवलेला आदर खूप सुखावून गेला. कोण कुठल्या लांब आफ्रिकेतील एका माणसाला दुसऱ्या देशात असे प्रेम मिळते या पेक्षा वसुधैव कुटुंबकम या तत्त्वाची उत्तम साक्ष अजून कोणती? प्रत्येक वेळेस तो फलंदाजीला आल्यावर प्रेक्षकांनी त्याला उभे राहून अभिवादन केले. तेव्हा वाटले भारतीयांनी त्याला अनिवासी तेंडुलकरचा दर्जा बहाल केला आहे. या निमित्ताने भारतीय प्रेक्षकाच्या रसिकतेला दाद द्यायला हवी!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा