आजचा लेख लिहायला बसलो तेव्हा रस्त्यावर सामसूम आहे. सकाळपासून कुणाचाही फोन आलेला नाही आणि फ्रीजमधले आइस्क्रीम फ्रिजमध्येच आहे.
भारतीयांना ३१ मार्चला टॅक्स जास्त भरावा लागल्याने नाही, तर वेस्ट इंडीजने प्रतिष्ठेच्या व्याजासह वर्ल्डकपची मुद्दलदेखील काढून घेतल्यामुळे अतोनात नैराश्य आले आहे असे दिसते. आपल्याकडे क्रिकेटविषयी पॅशन अशी आहे की ‘खेळात हारजीत असते’ हे भेकडपणाचे वाक्य मानले जाते. कालच्या सामन्यानंतर क्रिकेट रसिक निराश आणि त्यापेक्षा जास्तं शॉक्ड़ झालेले दिसतायत.
आपण कुठे कमी पडलो?
एकतर आपण चांगली फलंदाजी करूनदेखील आपला स्कोर वेस्ट इंडीजच्या आवाक्याबाहेर नेऊ शकलो नाही. कोहली, रहाणे, धोनी यांनी चांगलीच फलंदाजी केली. तरीसुद्धा रन रेटमध्ये निर्णायक वाढ करणाऱ्या सिक्सर्स आपण चारचं मारू शकलो. १२-२० ओवर्समध्ये षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांची उणीव अजून आपल्याला भासतीये. अजून चार ते पाच षटकार आपल्याला हवे होते ज्यामुळे आपला स्कोर चेस करणे अवघड झाले असते. या उलट वेस्ट इंडीजने ११ षटकार मारले. ते मारताना त्यांनी स्नायूंमधली रांगडी ताकद दाखवली. त्यामुळे ११ षटकारांचा ‘सिक्सपॅक’ आणि रांगड़या स्नायूंचा ‘सिक्सपॅक’ आपल्याला नॉकआउट करून गेला. चार्ल्स, सिमन्स, रूसेल यांनी कोण अधिक लांब मारेल, अशी जणू स्पर्धाच लावली होती. ह्या तिघांनी गेलप्रमाणेच जागेवरून षटकार खेचले. विमानतळावरच्या धावपट्टी इतकी सपाट खेळपट्टी मिळाल्याने काहीही धोका नव्हता. हवा होता फक्त खांद्यात् आणि हातात जोर. तो या वेस्ट इंडियन खेळाडूंकडे ठासून भरला आहेच. त्यामुळे टी २० सामन्याकरता जशी खेळपट्टी लागते, तशी मिळाल्यावर या फलंदाजानी धावा लुटल्या.
धोनी नक्की कमी पडला
कालच्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या आक्रमणामुळे धोनी हादरला असे वाटले. त्याचे डावपेच खुंटले असे वाटले. जेव्हा फलंदाज अशा लयीत असतात तेव्हा कर्णधाराचे पहिले कौशल्य असते म्हणजे त्यांची लय बिघडवणे. इथे आठवला मार्क टेलर. फलंदाज जबरदस्त भरात आहे म्हणल्यावर मार्क टेलर खेळाची गती कमी करत असे. त्यात गोलंदाजाशी क्षेत्ररक्षणावरून दोन दोन मिनिटे बातचीत कर, फील्ड प्लेसिंग बदल, गोलंदाजाला पळत येऊन थांबून परत मागे जाऊन पळत यायला सांग, अशी वेळ काढू तंत्रे वापरून लयीतल्या फलंदाजाला बोअर करण्याचे डावपेच वापरायचे. कालच्या सामन्यात खेळाचा स्पीड कमी करणे सोडाच तो जडेजा विवाह मुहूर्त गाठायच्या घाईने भरभर भरभर चेंडू टाकत होता. फलंदाज तूफानी हल्ला करतायत म्हणल्यावर कर्णधाराने आगगाडीची चेन खेचल्यावर कशी गाडी करकरत थांबते तसा खेळ संथ करायलाच हवा.
नो बॉलचे कवित्व
आपण नो बॉल टाकल्याने वेस्ट इंडीजचे नशीब फळफळले ही पळवाट आहे. शाळा क्रिकेट संपल्यावर नो बॉलचा कलंक गोलंदाजाला कधीही लागता कामा नये. वर्ल्ड कप उपांत्य सामन्यात नो बॉल टाकणे ही इतिहासकाराने भाषणात शिवजयंतीची तिथी विसरणे, पंचतारांकित हॉटेलमधल्या शेफने काजू पुलावात काजू घालायचे विसरणे, गवयाला मोठ्या संगीत जलसात षड्ज न लावता येणे इतकी प्राथमिक आणि माफ करता न येणारी चूक आहे. त्यामुळे आपण काल सामना जिंकण्याच्या योग्यतेचे नव्हतो, असे म्हणण्यास नो बॉलच्या चूका हे एक मोठे कारण आहे.
दव पडल्यामुळे गोलंदाजाना चेंडू पकडायला त्रास झाला आणि रात्री खेळपट्टी अजून ठणठणीत झाली हे खरे असले तरी बूमराह आणि नेहराने जेव्हा जेव्हा उत्तम स्लोवर वन्स वापरले तेव्हा तेव्हा फलंदाज चकले होते हे विसरून चालणार नाही. ठणठणीत खेळपट्ट्यांवर प्रतिस्पर्ध्याला रोखून धरणारी चांगली गोलंदाजी आपल्याकडे नाही, हे सत्य आहे.
कालच्या परिस्थितीत विंडीज संघ आपल्यापेक्षा जास्त चांगला खेळला ही वस्तुस्थिती आहे. आता पॉवर हिटर्स आणि सर्व परिस्थितीत उत्तम गोलंदाजी करणारे बॉलर्स यांचा शोध चालूच ठेवावा. कालचा सामना इतिहासजमा झाला. क्रिकेट रसिकाना आनंदाचे सुवर्णक्षण देणारा आपला संघ यातून धडे घेऊन नक्की उभारी घेईल, अशी खात्री आहे.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
WT20 BLOG : वेस्ट इंडीजच्या सिक्सपॅकने भारताचे पॅकअप!
कालच्या परिस्थितीत विंडीज संघ आपल्यापेक्षा जास्त चांगला खेळला ही वस्तुस्थिती आहे
Written by लोकसत्ता टीम
First published on: 01-04-2016 at 11:58 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by ravi patki on india vs west indies semi final match