फील हय़ूज गेला. आजाराने नाही. बेफाम गाडी चालवल्याने नाही, आत्महत्या नाही, निखळ आनंदासाठी मानवाने निर्माण केलेल्या क्रीडांगणावर चेंडू डोक्याला लागून गेला. हे पचनी पडणे नाही. सकाळपासून अनेक लोकांनी प्रतिक्रिया देताना हा विचित्र अपघात आहे आणि त्याला जनरलाईज करू नये वगैरे तारे तोडले.
इथे दोन मुद्दय़ांचा ऊहापोह करणे आवश्यक आहे. पहिला म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांचा. इतक्या टणक आणि चेंडूला उसळी देणाऱ्या खेळपट्टय़ा ऑस्ट्रेलियात अनेक वर्षे आहेत. त्यातून त्यावर गवत ठेवले जाते. म्हणजे बॉल प्रचंड वेगात पण येतो. साधारण तिसऱ्या दिवसापासून गुड लेंथ स्पॉटच्या जवळ आणि अनेक ठिकाणी मोठय़ा मोठय़ा भेगा पडायला सुरुवात होते. यापैकी कुठल्याही क्रॅकवर चेंडू पडला तर तो फलंदाजाला कसा आणि कुठे येऊन धडकेल हे अजिबात सांगता येत नाही. आधीच फलंदाजाला २२ यार्डावरून १५०च्या वेगाने येणाऱ्या चेंडूची लेंथ ओळखणे अवघड असते आणि त्यातून भलेमोठे क्रॅक्स म्हणजे देवाला साकडे घालायचे. मुळात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका इथल्या खेळपट्टय़ा फलंदाजाचे फलंदाजी कौशल्य बघत नाहीत. त्या बघतात मनुष्याच्या अस्तित्वाची लढाई. क्रूरपणे. दोन रेडय़ांना, दोन कोंबडय़ांना, दोन बोकडांना झुंजायला लावून राजे, महाराजे, सुभेदार, वतनदार, जनता मजा बघत बसतात ना तसे इथले क्रिकेट अधिकारी आणि प्रेक्षक आसुरी आनंद घेतात. बॉल छातीवर, खांद्याला, डोक्याला लागला की बेभान होऊन फलंदाजाला शिव्या घालतात. का तर म्हणे क्रिकेट शौर्याचा खेळ आहे. सॉरी! क्रिकेट खेळ आहे. त्याला उत्साहाचे, आनंदाचे, प्रफुल्लतेचे अधिष्ठान आहे. जीवघेण्या दुखापती, सांडलेले रक्त वगैरे ज्यांना बघायची हौस आहे त्यांनी बॉक्सिंग, कुस्ती यांच्या सामन्यांना जावे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांनी खेळपट्टय़ांचा दर्जा ताबडतोब सुधारणे आवश्यक आहे. मग मी म्हणतो, भारतीय खेळपट्टय़ा निश्चित आनंद देतात. इथे घाम गाळायचा असतो. रक्तरंजित क्रांती करायची नसते.
दुसरा मुद्दा ऊठसूट भारतीय उपखंडातल्या फलंदाजांना उसळणाऱ्या खेळपट्टय़ा झेपत नाहीत, अशी हाकाटी पेटवून बावळट ठरवणाऱ्या पाश्चिमात्य मीडियाचा. मनुष्याच्या क्षमतेच्या पलीकडे आवाहन असले की कसला भारतीय आणि कसला ऑस्ट्रेलियन. प्रवचनकार चॅपेल बंधू कुठेत? कालपासून प्रवचन ऐकले नाही ऑस्ट्रेलियन क्षमतेचे!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)