रवि पत्की – sachoten@hotmail.com
एजबॅसटन कसोटीचा पहिला दिवस कसोटी क्रिकेटच्या लौकिकाला साजेसा होता. कौशल्य, संयम, लढाऊ वृत्ती ह्याचे दोन्ही संघाकडून प्रदर्शन झाले. नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिला दिवस संपल्यावर फारसा आनंद झाला नसेल. पहिली फलंदाजी करून धावांचा डोंगर उभा करण्याचे त्यांचे मनसुबे धुळीला मिळाले.
खेळपट्टीचे स्वरूप:
गवत नसलेल्या खेळपट्टीवर कुणालाही पहिली फलंदाजीच करावीशी वाटणार. कोहलीने टॉस हरल्यावर ‘मी टॉस जिंकलो असतो तर गोलंदाजीच केली असती’ हे स्टेटमेंट डावपेचाचा भाग होते हे कुणीही सांगू शकेल. खेळपट्टीवर चेंडू दिवसभर सीम होत होता. सीमवर टप्पा पडल्यावर चेंडूने दिशा बदलल्याचे सतत दिसत होते. तसेच सुरवातीपासून अश्विनला स्पिन मिळाला. एकूण काय तर ही इंग्लंड मधली टिपिकल खेळपट्टी नाही.
वातावरण स्विंगला पोषक:
इंग्लिश हवामान असल्याने चेंडूने हवेत दिशा बदलल्याचे दिसत होते. जूना चेंडू रिव्हर्स स्विंग सुद्धा झाला. त्यामुळे खेळपट्टी आणि वातावरण गोलंदाजांना नक्कीच मदत करत आहे. हे बघता इंग्लंडच्या २८५ धावा बेताच्या असल्या तरी भारताला आव्हान देऊ शकतात.
झेल सुटायला नको होते:
मालिकेच्या पहिल्या सामन्यात सर्व डिपार्टमेंट्स मध्ये उत्तम कामगिरी होणे हे आत्मविश्वासाच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते. जेनिंग्सचा सुरुवातीलाच स्लिप मध्ये सुटलेला झेल आणि दिवसाच्या शेवटच्या षटकात कार्तिक कडून सुटलेला झेल किती त्रासदायक ठरतात हे पहायचे.
फास्ट बॉलर्सची कामगिरी:
इशांत, उमेश आणि शमीने सीमवर गोलनदाजी केली. मलानला पडलेला शमीचा चेंडू प्रचंड आत आला. इशांतचे अनेक चेंडू दिनेश कार्तिकने डोक्याच्या उंचीवर पकडले. तिन्ही फास्ट बोलर्सनी चांगली गोलंदाजी केली. पंड्याने धावा रोखून धरणारी गोलंदाजी छान केली. त्याला प्रत्येक डावात दोन विकेट्स मिळाल्या तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून तो उपयोगी पडू शकतो.
अश्विनची ऍक्शन इंग्लंडच्या हवामानासारखी सारखी बदलणारी:
अश्विन अत्यंत अभ्यासू खेळाडू आहे. आपल्या गोलंदाजीत काय नाविन्य आणता येईल याचा सारखा विचार तो करत असतो. प्रत्येक मोसमात काही नवीन प्रयोग तो करत असतो. कधी स्टार्ट बदल, कधी ऑफस्पिंनची ग्रीप बदल, कधी लेग स्पिन टाक. काल त्याने काही स्विंग होणारे चेंडू टाकले. अफगाणिस्तानचा रशीद एका ऍक्शन ने वेगवेगळे चेंडू टाकतो तर अश्विन वेगवेगळ्या ऍक्शन ने एकच चेंडू म्हणजे ऑफस्पिन टाकतो. हे मजेशीर आहे. मदत देणाऱ्या खेळपट्टीववर तो किती संयमाने चेंडू टाकतो ते पहावे लागेल.कारण विविधतेच्या आहारी जाऊन तो नियंत्रण घालवू शकतो हे दिसून आले आहे. गेल्या ६-७ वर्षात दहा वेगवेगळ्या ऍक्शन त्याने बदलल्या आहेत. वेगवेगळ्या स्टाईल ने अडखळत स्टंप पर्यंत धावत येणारा अश्विन नेत्रसुखद न वाटता गडबडीत वाटतो. असो. त्याने विकेट्स काढाव्या म्हणजे झाले.
अँडरसन, ब्रॉड यांच्या स्विंग आणि सिम गोलंदाजीवर भारतीय फलनदाजांची या खेळपट्टीवर नक्की परीक्षा होईल. दुसरा दिवस या सामन्यात निर्णायक ठरू शकतो.