२०१४ वर्ष क्रीडारसिकांसाठी पर्वणी ठरत आहे. फुटबॉल वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई खेळ, हॉकीचा विश्वचषक आणि क्रिकेटमधील अनेक महत्त्वाच्या लढती. भारत विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट मालिकेकडे रसिक डोळे लावून बसले आहेत. मुख्य म्हणजे अनेक वर्षांनी पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. हे म्हणजे फाईव्ह कोर्स मील समान आहे. इंग्लंडमधले क्रिकेट म्हणजे हवा, ढग, पाऊस, ऊन, वारे यांच्या लहरीपणाची हद्द. या सर्व गोष्टींचा निकालावर प्रचंड परिणाम होतो. फलंदाजाचे सर्वंकष कसब पणाला लागते. गोलंदाजाला अतिउत्साहावर नियंत्रण ठेवून हुरळून न जाता मारा करावा लागतो. प्रत्येक चेंडूचे कोट आणि टाय घातलेल्या मेंबर्सकडून काटेकोर परीक्षण केले जाते. उगाच कुणालाही वाह… वाह… केले जात नाही. होळीला दिवाळीचा आणि रंगपंचमीला ऋषिपंचमीचा दर्जा दिला जात नाही. क्रिकेटच्या पाठय़पुस्तकाला बायबल मानले जाते. उत्तम खेळीचे, शतकाचे, पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचे उभे राहून सभ्यपणे अभिनंदन केले जाते. कसोटी सामन्याकडे नर्मदा परिक्रमेच्या पावित्र्याने पाहिले जाते. क्रिकेट समालोचकांचे इंग्रजी ऐकताना इंग्रजीचा तास अॅटेंड केल्याचा आनंद मिळतो.
भारतामध्ये टी २०ला खऱ्या पंढरीच्या वारीचा मान मिळाला आहे. करमणूक, बाजारू क्रिकेटला उच्च पदावर नेऊन बसवल्यामुळे कसोटी सामन्यांची मानसिकता संपत चालली आहे. क्रिकेटचे पहारेकरी मारेकऱ्यांसारखे निर्णय घेत असल्याने खेळाडूसुद्धा टी २०ला आयुष्याचे ध्येय मानत आहेत. आयपीएलचे वेळापत्रक कसोटी सामन्यांचे वेळापत्रक ठरवत आहे. सलग चार ओव्हर्स टाकणे म्हणजे महापराक्रम समजला जात आहे. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांना सर्वोच्च महत्त्व आहे आणि टी २०ला तोंडी लावण्यापुरते महत्त्व आहे.
या सर्वाचा विचार करता मला वाटते, येती मालिका ही दोन देशांतल्या क्रिकेट संस्कृतीचा सामना असेल. कुठला फलंदाज किती धावा करेल, यापेक्षा तो किती वेळ उभा राहून टिच्चून फलंदाजी करेल, हे पाहायला हवे. उभा राहिला तर धावा होणारच. एकाच लेंथवर सलग ४०-४५ चेंडू टाकू शकणारा गोलंदाज हवा आहे. अँडरसन, ब्रॉड, प्लंकेट हे मोठय़ा मैफलीचे कसदार गायक आहेत. एकच स्वर घेऊन तासन्तास आळवत बसू शकतात. कुक, रूट, बेल खडूस फलंदाज आहेत. आपल्याकडे पुजारा आणि कोहली यांनाच कसोटीचे टेंपरमेंट आहे.
एकंदरीत काय तर जो विद्यार्थी वर्षभर मन लावून अभ्यास करतो आणि जो इतर सर्व व्यवधानं सांभाळून परीक्षेच्या आधी क्रॅश कोर्स लावून काही होते का बघतो यातली ही लढाई आहे. क्रॅश कोर्स करणारा विद्यार्थी पाच दिवस परीक्षेचा ताण सहन करतो का पाहायचे. त्याने तसे केले तर मालिका रंगतदार होईल. नाहीतर क्रॅश व्हायची भीती आहेच.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com