आपला सचिन म्हणजे त्याचं नावच आपला सचिन.. सचिन तेंडुलकर वगैरे स्कोअर बुकाकरिता, जन्मदाखल्याकरिता, पासपोर्टकरिता, पॅनकार्डकरिता असेल, पण एकशेपंचवीस कोटी भारतीय लोकांकरिता तो फक्त आपला सचिन! राहुल द्रविड हा द्रविड असतो, वीरेंद्र सेहवाग सेहवाग असतो, सुनील गावसकर गावसकर असतो, पण सचिन हा फक्त सचिनच असतो. कारण १९८९ साली जेव्हा तो पहिल्यांदा टीव्हीवर दिसला तेव्हापासून प्रत्येक भारतीय कुटुंबाने त्याला दत्तक घेऊन टाकला. तो प्रत्येक भारतीय कुटुंबातला शेंडेफळ आहे. पहिल्यापासून तो प्रत्येक भारतीय कुटुंबाशी असा जिव्हाळय़ानं का जोडला गेला, यावर संशोधन झालं असेल, लिहिलं गेलं असेल. भारतात त्याच्यावर इतकं लिहिलं गेलं आहे, जितकं परदेशात मोनालिसावर, शेक्सपीअरवर लिहिलं गेलं आहे. खरंच सचिनने आपल्याला का मोहिनी घातलीय?
नाथ पै यांच्या लोकप्रियतेविषयी लिहिताना पु.लं.नी लिहिलं आहे की नाथ पैंमध्ये एक विलक्षण धाकटेपण होते, जे मराठी जनतेला फार कौतुकाचं होतं. मला वाटतं, सचिनच्या बाबतीत हा सिद्धान्त बराच जवळचा आहे. सचिन टीव्हीवर पहिल्यांदा दिसला तोच सोळाव्या वर्षी. त्याचं तुरुतुरु पळणं, बालिश आवाज, लाजाळू हावभाव बघून प्रत्येक आजोबा-आजीला घरात रांगणाऱ्या बोबडकांदा नातवाचं प्रतिबिंब दिसलं. प्रत्येक मुलाला, मुलीला हाताला धरून ग्राऊंडवर खेळायला नेलेला लहान भाऊ दिसला. प्रत्येक आईला पाठीवर हात फिरवून दिवाळीत पोटभर बेसनाचे लाडू खाऊ घालावेत, असा ‘गुंडू’ दिसला आणि प्रत्येक बाबांना लहान असून शहाण्यासारखा वागणारा जबाबदार मुलगा दिसला. या त्याच्या धाकटेपणाचं कौतुक शतपटीनं काढण्याची दोन मुख्य कारणं म्हणजे त्याची निर्दोष वागणूक आणि त्याचा भीम पराक्रम.
त्याच्या लोकप्रियतेचा प्रत्येक वयोगटाला, प्रत्येक सामाजिक स्तराला, प्रत्येक कार्यक्षेत्राला स्पर्श झाला आहे. त्यानं सातत्यानं गोलंदाजांना फोडून काढलेली त्याची बॅटिंग लहान मुलांना वेड लावते. तरुणांना आणि जाणकारांना त्याच्या बॅटिंगमधल्या नजाकतीनं भारावून जायला होतं. कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, स्क्वेअर कट, बॅकफूटवर कव्हर आणि पॉइंटकडे मारलेले शॉट्स, शरीर पूर्ण भरात असताना ग्राऊंडच्या विविध भागांत लीलया मारलेले सिक्सर यांनी तमाम भारतीय पागल झाले. क्रिकेटची आवड हे भारतीय असण्याचं ‘क्वालिफिकेशन’ आहे. या खेळानं प्रत्येक भारतीयावर गारुड केलं आहे. बहुतांशी मुलांनी पहिला खेळ लहानपणी क्रिकेटचा खेळला आहे. अनेकांनी पुढे शाळा, कॉलेज, ऑफिसच्या स्तरावर तो चालू ठेवला. दिवसागणिक खेळण्यातली गोडी वाढतच गेली. खेळातून मिळणारा आनंद अवर्णनीय, याचा प्रत्येकाला अनुभव येतो. बॅटच्या मधोमध घेऊन कव्हर्समधून मारलेला फोर, पहिल्या स्लिपमध्ये दोन्ही हातांच्या मध्यभागी पकडलेला शार्प कॅच, मिडल स्टम्पवर टप्पा पाडून ऑफ स्टम्प उखडवून टाकलेला बॉल, याच्या स्वर्गीय आनंदात दिवस कसा निघून गेला कळत नाही आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ खेळताना तो किती अवघड आहे, याची पदोपदी जाणीव होते. बॅट्समनला आऊट होण्यास एक बॉल पुरेसा असतो. बॉल पहिला पण असू शकतो. बॅट्समन कॉट, बोल्ड, एलबीडब्ल्यू, रन आऊट, स्टम्प, हिट विकेट, हँडलिंग द बॉल अशा अनेकप्रकारे आऊट होऊ शकतो. मैदानात गेल्यावर एक लाख प्रेक्षक, टीव्हीवरील कोटय़वधी प्रेक्षक, आग ओकणारे गोलंदाज, मनात चाललेले कुटुंबापासून खेळापर्यंतचे विचार, विश्वासघातकी खेळपट्ट्या, पंचांचे चुकीचे निर्णय, धोकादायक हवामान, मीडिया या सर्वांवर मात करून धावा करायच्या असतात. मुळातच हा अवघड खेळ. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं ग्रहमालेएवढं ओझं पेलून सातत्यानं नवनवीन शिखरं पादाक्रांत करत राहणं म्हणजे पृथ्वीला खांद्यावर उचलण्यासारखंच. सचिननं हे साध्य केलं म्हणून विविध स्तरांवर क्रिकेट खेळलेल्या लोकांना त्याचं कर्तृत्व अतुलनीय, अलौकिक वादातीत वाटतं.
हा सर्व भीम पराक्रम करताना त्यानं जपलेला संयम, नम्रता, यशापयश पचवण्याची ताकद, कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा, कुटुंबवत्सलता, आदरभाव, समर्पण हे गुण त्याला समाजातील प्रत्येक स्तरामध्ये महामानवाचा दर्जा प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरले आहेत.
सचिनच्या खेळाशी आपण आपला स्वाभिमान जोडला आहे. सचिन यशस्वी होणं म्हणजे आपला शाळेत पहिला नंबर येणं, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणं, पाकिस्तानच्या मल्लाला कुस्तीत आपण एका हातानं आसमान दाखवणं. सचिनची सेंच्युरी झाल्यावर भारतात सर्वाधिक फोन कॉल्स, एसएमएस येतात. ऑफिसमध्ये आनंदी वातावरण असतं, कारखान्यातील उत्पादन वाढतं, असं आढळून आलं आहे. म्हणजे सचिन आपला आनंददूत आहे. केवढा परमार्थ झाला आहे त्याच्या हातून.
तीच परिस्थिती तो लवकर आऊट झाल्यावर बघा. घरात, शाळेत, ऑफिसमध्ये चिडचिड आणि चिडचिड. सचिनच्या नावानं बोंबाबोंब. पूर्ण देशाची पराभूत मानसिकता.
ही प्रतिक्रिया पण लोकांच्या अथांग प्रेमाचा भाग आहे, हे सचिन जाणून आहे. म्हणूनच आपण प्रयत्नात कुठेही कमी पडू नये, हे मागणं तो देवाकडे मागत असतो.
दोनशे कसोटी, ५०,००० च्यावर आंतरराष्ट्रीय धावा, शंभरच्या वर शतके वगैरे वगैरे रेकॉर्ड बुक करतो. आपल्याकरिता सचिन म्हणजे आपल्या रेशन कार्डावरचे भीम पराक्रमी शेंडेफळच आणि शेंडेफळाचं कौतुक करताना कुटुंब कधी निवृत्त होतं का?
– रवि पत्की
sachoten@hotmail.com 

Story img Loader