भारतीय संघाची पहिली विकेट पडली की स्टेडियमवर शांतता पसरते आणि दुसऱयाच क्षणाला ‘द विराट कोहली ऑन द ग्राऊंड’ हे रवि शास्त्री यांचे उद्गार कानी पडताच पुन्हा एकदा जो काही हुरूप संपूर्ण स्टेडियम आणि टेलिव्हिजनसमोर बसलेल्या प्रेक्षकांसमोर संचारतो हे विलक्षण आहे. एखाद्या खेळाडूच्या मैदानात येण्याने क्षणार्धात संघाला बसलेला धक्का विसरून पुन्हा जल्लोषासाठी प्रेक्षक सज्ज होणे ही तू केलेली ‘विराट’ कमाई आहे.

चित्रपटात ज्याप्रमाणे नायक हा वरचढ पाहण्याची चित्रपटरसिकांची मानसिकता राहिली आहे. त्याप्रमाणे आता विराट कोहली हा भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ‘इंडियन सुपरहिरो’ बनलाय. खलनायकाने आपल्या नतद्रष्टतेची कितीही खालच्या दर्जाची पातळी गाठली तरी नायकानेच बाजी मारली की प्रेक्षकांना भरून पावते. विराटनेही आजवर मिचेल जॉन्सन, ट्रेंट बोल्ट, मिचेल स्टार्क, मलिंगा, वहाब रियाझ या अशा अनेक खलनायकांच्या चिंध्या उडवाव्यात अशी आपली अपेक्षा असते आणि तू वेळोवेळी अपेक्षांची पूर्तता देखील केलीस. चित्रपटाला क्रिकेटशी जोडलं म्हणून सांगतो.. तू मला ‘द माऊंटन मॅन’ चित्रपटात अहंकाराने माजलेल्या डोंगरापुढे आत्मविश्वासाचा हातोडा घेऊन उभा असलेल्या नवाजुद्दीनप्रमाणे भासतोस. ‘हमारे सामने तो पहाड ने भी घुटने टेक दिये…तो ये अंग्रेज गोलंदाज क्या चिज है..’, असा फिल्मी स्टाईल डायलॉगने विराट आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत धावा वसुल करताना दिसेल अशी आशा आहे.

तत्पूर्वी, विराट आज २९ व्या वर्षात पदार्पण करतोय. त्याला अजून बरंच क्रिकेट खेळायचं आहे. विराटच्या आतापर्यंतच्या करिअरमधील गेली तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची राहिली आहेत. तो जितंक मैदानात आपल्याला निष्ठेने खेळताना दिसतो तितकेच तो वैयक्तिक आयुष्यात देखील सराव आणि आपली फिटनेस राखण्यासाठी मेहनत घेतो. विराटच्या ऑफ फिल्ड मेहनतीचे आजीमाजी खेळाडूंच्या तोंडून अनेकदा कौतुक ऐकलंय. शतकी कामगिरी केल्यानंतरही अगदी सामन्याचा पहिलाच चेंडू खेळावा अशी उर्जा विराटमध्ये दिसणे हेच त्याच्या ऑफ फिल्ड मेहनतीचे फळ म्हणावं लागेल. या अवलियाने एक वेगळीच ध्येयासक्ती जोपासलीय. ती कायम रहावी हीच अपेक्षा.

रेकॉर्ड वगैरे होत राहतील. याची काळजी तुला नसेलच मुळी..आणि हो, वैयक्तिक बोलतोय..पण ते अनुष्का प्रकरण व्यवस्थित हाताळतोयस हं..ऑल द बेस्ट..लोक काहीही म्हणोत..’कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है केहेना’…असो. इंग्लंडच्या बेन स्टोक्सचा आऊट साईड ऑफ स्टम्पवर चेंडू आला की तूझा मख्खन सारखा स्वेअर ड्राईव्ह पाहायला आतूर झालोय..चला, अपेक्षा खूप झाल्या बाय द वे वाढदिवसाच्या शुभेच्छा..आजन्म दुखापतीपासून तू दूर राहावास हिच प्रार्थना..बाकी..जीते रहो..खेलते रहो..

– मोरेश्वर येरम
moreshwar.yeram@gmail.com

Story img Loader