वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे संघाबाहेर गेला, निवड समितीने शार्दुल ठाकूरला याजागी भारतीय संघात स्थान दिलं. मात्र सध्या त्याला झालेली दुखापत पाहता, तो भारतीय संघाचा २०२० वर्षातला न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
भुवनेश्वर कुमार सध्या Sports hernia आजाराने त्रस्त आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना त्याच्या या त्रासाबद्दल आधी समजलंच नव्हतं. मात्र त्रास वाढल्यानंतर भुवनेश्वरला संघातून विश्रांती देण्यात आली आहे. “भुवनेश्वर न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार हे नक्की आहे. कदाचीत आयपीएलच्या हंगामापर्यंत तो पुनरागमन करु शकेल”, सुत्रांनी माहिती दिली. राष्ट्रीय क्रिकेट अदाकमीलाही भुवनेश्वरच्या या दुखापतीबद्दल नीट माहिती नसल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत भुवनेश्वर खेळला होता. याच हंगामात त्याची दुखापत बळावल्याचं बोललं जात आहे.
२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, भुवनेश्वर कुमार १४ ऑगस्ट रोजी विंडीजविरुद्ध कॅरेबियन बेटांवर अखेरचा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना खेळला. यानंतर भुवनेश्वर पहिल्यांदाच विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत घरच्या मैदानावर खेळला. याआधी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेतही तो खेळला नव्हता. त्यामुळे आगामी काळात भुवनेश्वर आपल्या दुखापतीमधून कधी सावरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – ….म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा