भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव जयवंत लेले यांच्या निधनामुळे क्रिकेट क्षेत्राने उत्तम प्रशासक गमावला आहे, अशा शब्दांत मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यासह अनेक संघटक व खेळाडूंनी लेले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
एन. श्रीनिवासन : लेले यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मला खूप धक्का बसला. बडोदा संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी बीसीसीआयमध्ये तीन दशके संघटक म्हणून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. सहसचिव व सचिव म्हणून जवळजवळ वीस वर्षे त्यांनी मंडळाचा कारभार सांभाळला. मंडळाच्या पंच समितीवरही त्यांनी अनेक वर्षे काम केले.
संजय पटेल : अतिशय कष्टाळू संघटक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सतत काही नवीन संकल्पना अमलात आणण्यासाठी ते प्रयत्न करीत असत. मंडळाचा कारभार पारदर्शी असावा असाच त्यांचा कटाक्ष असे. सचिवपदी माझी निवड झाल्यानंतर लेले यांनी मला या पदावर काम करण्यासंदर्भात काही बहुमोल सूचना केल्या.
सचिन तेंडुलकर : दोन दशकांपूर्वी माझ्या कारकिर्दीची सुरुवात होत असताना त्यांनी दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन उपयोगी ठरले. माझी दिमाखदार कारकीर्द घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
अंशुमन गायकवाड :  संघटक म्हणून त्यांची शैली अतुलनीय होती. त्यांनी कधीही व कोणालाही नकार दिला नाही. त्यांच्यासारखा उत्तम प्रशासक पुन्हा घडणार नाही.
अनंत माटे: स्पष्टवक्ता म्हणून जरी लेले यांची ख्याती होती तरीही क्रिकेटचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नव्हता. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आम्ही ज्या ज्या वेळी महत्त्वाचे सामने आयोजित करण्याचे प्रस्ताव दिले होते, त्या त्या वेळी त्यांनी आमची विनंती मान्य केली होती. त्यांनी प्रत्येक वेळी क्रिकेटहितास प्राधान्य दिले.
नयन मोंगिय :  वयाच्या बाराव्या वर्षांपासून मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. मला ते वडिलांच्या स्थानी होते. केवळ क्रिकेट नव्हे, तर अन्य समस्यांबाबतही मी हक्काने त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असे व तेही अतिशय आनंदाने मला बहुमोल सल्ला देत असत.

Story img Loader