इंडियन प्रीमियर लीग नामक आर्थिक खाण मिळवून देणाऱ्या स्पध्रेप्रमाणेच भारतीय क्रिकेटच्या अनेक मोठमोठय़ा आर्थिक व्यवहारांमध्ये पुढाकार घेऊन नायक झालेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी गेली तीन वष्रे खलनायक ठरले आहेत. परंतु बुधवारी बीसीसीआयने या वादग्रस्त प्रशासकाच्या क्रिकेट कारकिर्दीला अखेर पूर्णविराम दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये मोदींना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा ठोठावली. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने त्यांना अनुशासनहिनता आणि गैरवर्तन यांसदर्भातील आठ आरोपांबाबत दोषी ठरवून ही कारवाई केली.
बुधवारचा दिवस मोदी आणि बीसीसीआय यांच्यातील न्यायालयीन लढायांमुळे नाटय़मय ठरला. बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा फक्त अध्र्या तासात आटोपली. परंतु ४९ वर्षीय प्रशासक मोदी यांच्यावर आजीवन बंदीचा निर्णय मात्र एकमताने घेण्यात आला.
आयपीएलच्या यशाचा शिल्पकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या मोदी यांनी आपली प्रशासकीय कारकीर्द वाचवण्यासाठी बुधवारी अखेपर्यंत प्रयत्न केले. त्यांनी बीसीसीआयच्या कार्यकारिणी सदस्यांनी पत्रे लिहून आपली कारकीर्द वाचवण्यासाठी आर्जवी विनंती केली होती
‘‘कार्यकारिणी समितीमधील एकाही सदस्याने मोदी यांची पाठराखण केली नाही आणि एकमताने त्यांच्यावर आजीवन बंदीचा निर्णय घेण्यात आला,’’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अरुण जेटली आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने जुलैमध्ये आपला १३४ पानी अहवाल सादर केला होता. यात आर्थिक गैरव्यवहार, गैरवर्तणूक आणि बीसीसीआयचे नुकसान करणाऱ्या कारवाया यासंदर्भातील आठ आरोपांबाबत त्यांना दोषी ठरवण्यात आले.
मोदी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना हा बीसीसीआयचा अंतर्गत निर्णय असल्याचे म्हटले. परंतु तोवर सर्व सदस्यांना शिस्तपालन समितीचा अहवाल देण्यात आला होता.
मोदी यांच्यावरील कारवाईसाठी तीन वर्षांची प्रतीक्षा
जुलै २०१०पासून मोदी यांना शिस्तपालन समितीने अनेकदा सुनावणीसाठी बोलावले होते. परंतु वैयक्तिकपणे ते एकदाही हजर राहिले नव्हते. जिवाला धोका असल्याचे कारण दाखवत मोदी सध्या लंडनमध्ये निवास करीत आहेत.
मुंबईत आयपीएलची अंतिम फेरी झाल्यानंतर काही क्षणांत २५ एप्रिल २०१० या दिवशी बीसीसीआयच्या घटनेतील कलम ३२(४)चा भंग केल्याप्रकरणी मोदी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर तीन कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. मोदींनी या तिन्ही नोटिसांना उत्तर पाठवले होते.
२०१०च्या आयपीएल मोसमात पुणे वॉरियर्स आणि कोची टस्कर्स हे दोन नवे संघ सामील करण्यात आले. यासंदर्भातील लिलावानंतर मोदी यांचा उंचावणारा आलेख घसरायला सुरुवात झाली. मोदी यांनी कोची फ्रेंचायझीच्या मालकीसंदर्भातील माहिती ‘ट्विटर’वर जाहीर केली होती. त्यामुळे शशी थरूर यांना आपले केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रिपद गमवावे लागले होते. मोदी यांनी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझी यांच्यातील गोपनीयतेसंदर्भातील कराराचा भंग केला होता. त्यामुळेच एप्रिल २०१०मध्ये त्यांची आयपीएलचे प्रमुख आणि आयुक्त या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. निलंबनाचे पत्र आणि २२ आरोप असलेले ३४ पानी पत्र मोदी यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले होते.
मोदी गेली तीन वष्रे आपण निर्दोष असल्याचा बचाव ट्विटर आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते करीत होते. परंतु बीसीसीआयच्या समितीसमोर वैयक्तिकपणे सामोरे जाण्याचे त्यांनी टाळले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा