शरीरसौष्ठवपटू अब्दुल रेहमानचा रोमांचकारी प्रवास
ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर तो मृत्यूच्या दारी पोहोचला होता. मात्र कमालीची जिद्द व त्याला सहकाऱ्यांनी दिलेली साथ यामुळेच त्याने अनेक संकटांवर मात करीत शरीरसौष्ठव स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली आहे. उत्तर प्रदेशमधील अब्दुल रेहमान याची ही कथा एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखीच आहे.
अब्दुलने नुकत्याच झालेल्या स्वयंभू प्रतिष्ठानच्या निमंत्रितांच्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेतील दिव्यांग विभागात भाग घेतला होता. एक पाय कृत्रिम असलेल्या या स्पर्धकाला या स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान मिळवता आले नाही. मात्र त्याने दाखविलेल्या पीळदार स्नायूंच्या प्रात्यक्षिकांचे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अतिशय भावविवश होत त्याने व्यासपीठावरून प्रेक्षकांचा निरोप घेतला.
‘‘या स्पर्धेत पदक मिळविता आले नसले तरी आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्याला पदक मिळेल,’’ असा विश्वास अब्दुलने व्यक्त केला. अब्दुल हा आग्रा येथील खेळाडू आहे. २०१०मध्ये झालेल्या एका घटनेत त्याच्या वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात अब्दुलला डावा पाय गमवावा लागला. दोन महिने तो आग्रा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. आपला एक पाय गेला आहे असे लक्षात आल्यानंतर जयपूर येथे कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याकरिता त्याला काही महिने जयपूर येथे राहावे लागले. शंभर टक्के तंदुरुस्त होईपर्यंत त्याला चार वर्षांचा कालावधी लागला. या काळात त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी त्याच्याविषयीच्या आशा सोडून दिल्या होत्या. कृत्रिम पाय मिळाला तरी तो आयुष्यात पुन्हा उभारी धरेल अशी खात्री त्याच्या सहकाऱ्यांना वाटत नव्हती. मात्र अब्दुलला कमालीचा आत्मविश्वास होता. त्याची इच्छाशक्ती दांडगी होती. त्यामुळेच जीवघेण्या अपघातामधून तो बरा झाला, अर्थात कृत्रिम पाय घेऊनच.
बुटांची खोकी करण्याचा पारंपरिक व्यवसाय तो सांभाळत असे. तसेच हौस म्हणून शरीरसौष्ठव खेळातही तो भाग घेत असे. अपघात झाल्यानंतर कृत्रिम पाय जोडेपर्यंतच्या काळात त्याच्या पायावर सात-आठ वेळा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. उपचारातून वेळ मिळेल तसा तो आपला व्यवसाय सांभाळत असे. या कालावधीत त्याचे आई-वडील, पत्नी यांचे संपूर्ण सहकार्य मिळाले, यामुळेच आपण तंदुरुस्त होऊ शकलो. कृत्रिम पाय लावल्यानंतर तो पुन्हा नियमित व्यायामशाळेत जाऊ लागला. सुरुवातीला त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी त्याने व्यायामशाळेत व्यायाम करण्याचा धोका पत्करू नये असा सल्ला दिला. मात्र त्याने या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. नियमित सरावाच्या जोरावर पुन्हा तो शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेऊ लागला. त्याने राज्य व अखिल भारतीय स्तरावर अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. व्यायामशाळेत तो १५ खेळाडूंना मार्गदर्शनही करीत आहे.