बॉलिवुड अभिनेता वरुण धवन आणि भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन गमतीशीर स्वभावासाठी ओळखले जातात. हे दोन्ही धवन शनिवारी आमनेसामने आले होते. वरुण धवनने दोघांच्या या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेता वरुण धवनने उर्वरित भारतीय संघासोबतचे फोटोही शेअर केले आहेत. शिखरने आपल्याला काही कोडी विचारल्याचे वरुणने सांगितले आहे.

भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. त्यापूर्वी, वरुण धवनची अचानक संघाशी भेट झाली. यावेळी त्याची पत्नी नताशा दलालही त्याच्याबरोबर होती. “पहाटे चारच्या वेळेत माझी अवस्था मिठाईच्या दुकानात एखाद्या मुलाप्रमाणे होती. भारतीय क्रिकेट संघाला भेटून फार छान वाटले. त्यांच्या आगामी दौऱ्याबद्दल गप्पा मारायला खूप उत्साह वाटला. तसेच शिखर धवनने मला काही कोडी विचारली,” ट्वीट वरुणने केले आहे.

१८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी अगोदर शिखर धवनची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, केएल राहुल तंदुरुस्त झाल्याने पुन्हा त्याला कर्णधार म्हणून बोलावण्यात आले आहे. त्यामुळे शिखर धवनकडे आता उपकर्णधार पद देण्यात आले आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ शनिवारी रात्री रवाना झाला आहे. बीसीसीआयने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यातही शिखर धवनने एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. ही मालिका भारताने ३-० अशा फरकाने जिंकली होती.

Story img Loader