Shraddha Kapoor said now ask Siraj what to do with this free time: रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक २०२३ चा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर १० विकेट्सने ऐतिहासिक विजय नोंदवला. त्याचबरोबर आठव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. या महत्त्वाच्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाची कामगिरी केली. त्यामुळे त्याच्यावर आता सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही सिराजच्या या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली असून एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे, जी सर्वत्र व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजीचे मोडले कंबरडे –
हैदराबादच्या या वेगवान गोलंदाजाने नव्या चेंडूने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ७ षटकांत २१ धावा देत ६ गडी बाद करत श्रीलंकेची फलंदाजी उद्ध्वस्त केली. रविवारी (१७ सप्टेंबर) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर, श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या सुरुवातीपासूनच लंका दहन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या १५.२ षटकांत ५० धावांत स्वस्तात गारद झाला. यानंतर भारताने ६.१ षटकांत लक्ष्याचा जोमाने पाठलाग केला आणि आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली.
सिराजसाठी श्रद्धा कपूरने शेअर केली खास इन्स्टा स्टोरी –
वीकेंडला आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. त्यामुळे सर्वांनी त्यानुसार नियोजन केले होते. पण सामना अवघ्या २ तासात संपला, त्यानंतर उरलेल्या वेळेत आपले मनोरंजन कसे करायचे हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. अशी विचारणाही श्रद्धा कपूरने केली. तिने मोहम्मद सिराजलाच हा प्रश्न विचारण्यास सुचवले. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर कारमधील साध्या पांढऱ्या ड्रेसमध्ये स्वतःचा फोटो शेअर करत श्रद्धाने लिहिले, “आता सिराजलाच विचारा की या मोकळ्या वेळेचे काय करायचे…”
एका षटकात ४ विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज –
मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात सहा चेंडूत चार बळी घेतले. प्रथम, त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमाला एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. पाचवा चेंडू चौकारासाठी गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले.