बॉलीवूडने चरित्रपट बनवून माझ्यावर फार मोठे उपकार केले नाहीत, अशा शब्दांत ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी सलमान खानचे वडील सलीम खान यांना प्रत्युत्तर दिले. माझ्यावर चित्रपट काढण्यात आला हे ठीक आहे. या चित्रपटाने कोट्यावधींचा व्यवसाय केला असला तरी मी या कथेसाठी केवळ एका रूपयाचे मानधन घेतले आहे, असे मिल्खा सिंग यांनी सांगितले. रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदी काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची नियुक्ती करण्यात आल्यानंतर मिल्खासिंग यांच्यासह अनेक क्रीडापटुंनी नाराजी व्यक्त केली होती. या वादात सलमानची पाठराखण करताना सलीम यांनी मिल्खा सिंग यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या योगदानाची आठवण करून दिली होती. याच चित्रपसृष्टीने तुम्हाला जगाच्या विस्मृतीत जाण्यापासून वाचवले, अशी खोचक टीका सलीम खान यांनी केली होती.
VIDEO: ऐश्वर्याकडून सलमानचे समर्थन 
या टीकेला प्रत्युत्तर देताना मिल्खा सिंग यांनी म्हटले की, सलीम यांना त्यांचे मत मांडू दे, मला त्याबाबत काहीही म्हणायचे नाही. मात्र, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अॅम्बेसेडरची निवड करताना विचार करायला हवा होता. क्रीडा क्षेत्रातीलच एखादी व्यक्ती ब्रँड अॅम्बेसेडर व्हायला पाहिजे होती. सचिन तेंडुलकर, पी.टी.उषा, अजितपाल सिंग, राज्यवर्धन राठोड यांच्यासारखे खेळाडू असताना इतर क्षेत्रातील व्यक्तीला अॅम्बेसेडरपदी नेमण्याची काय गरज आहे?, असा सवाल मिल्खा सिंग यांनी उपस्थित केला. याशिवाय, सलीम खान मला चुकीचे ठरवत असतील तर मी त्याच्याशी सहमत नाही. संपूर्ण देशाचे हेच मत आहे आणि ते माझ्या पाठीशी आहेत, असे मिल्खा सिंग यांनी सांगितले.
वाद ही सलमानसाठी नवीन गोष्ट नाही- कतरिना कैफ 

Story img Loader