भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधील निवृत्तीबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढील वर्षीचा ‘आयपीएल’ हंगाम खेळून निवृत्ती पत्कारणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘आयपीएल’ कारकीर्दीतील अखेरचा सामना तो चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक क्रिकेटर्स बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहतात. त्यामुळे धोनीही बॉलिवूडमध्ये अभिनय करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
धोनीच्या आयुष्यावर आधारित आलेल्या ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामध्ये सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. त्यामुळे त्याचा सिक्वेल आल्यास धोनीला त्या भूमिकेत पाहणं थोडं कठीणच असेल. मात्र धोनीदेखील अभिनय करण्यास फारसा इच्छुक नाही. अभिनय करणं सोप्पं नसून आपण क्रिकेटशीच जोडलेलो राहणार आहोत असं धोनीने स्पष्ट केलं आहे.
धोनीने केली IPL मधील निवृत्तीसंदर्भातील घोषणा; म्हणाला, “मी अखेरचा सामना…”
धोनीने याआधीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासंबंधी आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, “तुम्हाला माहिती आहे की, बॉलिवूड हे काही मला जमणार नाही. जिथपर्यंत जाहिरातींचा संबंध आहे तर मी तिथे आनंदी आहे. पण जेव्हा चित्रपटांचा विषय येतो तेव्हा मला वाटतं हे आव्हानात्मक आहे आणि ते हाताळणंही खूप कठीण आहे. अभिनेते चांगलं काम करत असून मी हे त्यांच्यावर सोडून देईन. मी क्रिकेटशीच संबंधित राहीन. जास्तीत जास्त मी जाहिरातींमध्ये अभिनय करु शकतो. त्यापेक्षा जास्त नाही”.
नुकतंच हरभजन सिंगने तामिळ चित्रपट ‘फ्रेंडशिप’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हरभजन सिंगने आपल्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे. याआधी ब्रेट ली, अजय जडेजा, विनोद कांबळी यांसारख्या क्रिकेटपटूंनीही अभिनयात आपलं नशीब आजमवलं आहे. पण कोणालाही अपेक्षित यश मिळालं नाही.