हॉकी

तुषार वैती

काही माणसे जिद्दीनं, वेडानं झपाटलेली असतात. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हॉकी प्रशिक्षक मर्झबान पटेल ऊर्फ ‘बावा’ हे त्यापैकीच एक नाव. दुपारचे चार वाजले की मुंबई हॉकी असोसिएशनच्या अ‍ॅस्ट्रोटर्फवर किंवा स्टेडियमसमोरच्या मातीवर दररोज लहान मुलांना प्रशिक्षण देणारी एक व्यक्ती दिसून येते. गेली चार दशके अविरतपणे हे अभियान सुरू आहे. हॉकी स्टिक आणि चांगले शूज घेण्याची कुवत नसलेल्या तळागाळातल्या, गरीब घरातून आलेल्या मुलांना थेट ऑलिम्पिकचं स्वप्न दाखविणारं आणि ते पूर्ण करून दाखवणारं हॉकीचं विद्यापीठ म्हणजे मर्झबान पटेल. कोणतीही गुरुदक्षिणा न घेता, वेळप्रसंगी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करणारे, कोणत्याही पुरस्कर्त्यांची आशा न बाळगणाऱ्या मर्झबान पटेल यांनी असंख्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पियन हॉकीपटू घडवले आहेत.

वयाच्या १४व्या वर्षांपर्यंत मर्झबान यांना हॉकी म्हणजे काय, हेसुद्धा माहीत नव्हतं. सायन कोळीवाडय़ात राहत असताना शेजारी राहणारा त्यावेळचा नावाजलेला हॉकीपटू मुनीर खानला पाहून ते हॉकीकडे आकर्षित झाले. हॉकी स्टिकचं आकर्षण निर्माण झालेल्या मर्झबान यांनी नंतर हॉकीपटू घडविण्याचा ध्यास घेतला. सुरुवातीला विविध ठिकाणी जाऊन गोरगरीब मुलांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना प्रशिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. फक्त गल्लीबोळापुरती हॉकी खेळलेल्या मर्झबान यांना व्यावसायिक प्रशिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही या खेळातील बारकावे त्यांनी आत्मसात केले. तळागाळातल्या मुलांना स्वत: हॉकी स्टिक विकत घेऊन त्यांनी हॉकी खेळाविषयी आवड निर्माण केली. याच मुलांमधून त्यांनी अनेक दर्जेदार खेळाडू देशाला दिले.

मर्झबान पटेल यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यही पूर्णपणे गुंतागुंतीचे आहे. मालाड येथील चिल्ड्रन्स अकादमी आणि मरिन लाइन्स येथील अवर लेडी ऑफ डोलर्सचे प्रशिक्षकपद सांभाळणारे बावा हे बॉम्बे रिपब्लिकन्स नावाचा क्लबही चालवतात. १९६३ साली या क्लबची स्थापना झाली. १९७९मध्ये हॉकी प्रशिक्षणाकडे वळलेल्या बावा यांनी नंतर या क्लबची सूत्रे सांभाळली. अपुऱ्या निधीअभावी कधीही हा क्लब बंद पडेल, असे भाकीत अनेकांनी वर्तवले. पण या क्लबकडून घडलेल्या अनेक माजी हॉकीपटूंनी या क्लबचा गाडा अद्याप चालू ठेवला आहे. शूज बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या बावा यांनी वेळोवेळी स्वत:कडचे पैसे खर्च करत हा क्लब चालू ठेवला आहे. अनेक वेळा स्वत:वर होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी साठवलेले पैसेही त्यांनी क्लबसाठी खर्च केले. या वर्षी राज्य शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्य क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या पैशातूनच बावा यांनी आपल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली.

मर्झबान पटेल यांनी फक्त हॉकीपटूच घडवले नाहीत, तर खडतर प्रसंगाचा सामना करण्याचे बळही त्यांना दिले. मरिन लाइन्सच्या रस्त्यांवर हॉकी खेळणाऱ्या युवराज आणि देविंदर वाल्मीकी या बंधूंना बावा सरांनी थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून दिली. बावा सरांनीच आमच्यात हॉकीचं बीज रोवलं. अवर लेडी ऑफ डोलोर्स संघाकडून खेळताना पाहिल्यानंतर बावा सरांनी आम्हाला पहिल्यांदा संधी दिली. बॉम्बे रिपब्लिकन्सच्या वरिष्ठ खेळाडूंनी आणि बावा सरांनी आम्हाला एक उत्कृष्ट हॉकीपटू म्हणून घडविण्यात मोलाची भूमिका बजावली, असे युवराज आणि देविंदर सांगतात.

अनेक आंतरराष्ट्रीय हॉकीपटूंचे मार्गदर्शक

जवळपास ४० वर्षे हॉकी प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या मर्झबान पटेल यांनी जवळपास ५७ दर्जेदार हॉकीपटू देशाला दिले. भारताचा माजी गोलरक्षक एड्रियन डिसूझा, ऑलिम्पियन वीरेन रस्किन्हा, ज्युड मेनेझेस, युवराज वाल्मीकी, ऑलिम्पियन देविंदर वाल्मीकी, भारताच्या कनिष्ठ संघाचा गोलरक्षक सूरज करकेरा अशी लांबलचक यादी बावा यांच्या प्रशिक्षकपदाखाली देशाला मिळाली.

एकाच वेळी गुरु-शिष्यांना शिवछत्रपती पुरस्कार

राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारांना तीन वर्षांनंतर यंदाचा मुहूर्त मिळाला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात गुरू मर्झबान पटेल आणि शिष्य युवराज व देविंदर वाल्मीकी यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला पदके मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या युवराज व देविंदरला शिवछत्रपती पुरस्काराने तर ४० वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय हॉकीपटू घडविणाऱ्या मर्झबान यांना राज्य शासनाच्या क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरविण्यात आले. याविषयी बावा म्हणतात, ‘‘मी कधीही कोणत्याही पुरस्काराची, सन्मानाची अपेक्षा बाळगली नाही. पण एकाच वेळी आपल्या शिष्यांसोबत महाराष्ट्र सरकारचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार स्वीकारताना गहिवरून आले होते. पुरस्कार स्वीकारताना खूप आनंदी होतो. गेल्या अनेक वर्षांची मेहनत फळाला आली.’’

Story img Loader