आठवडय़ाची मुलाखत : लैश्राम बॉम्बयला देवी, आंतरराष्ट्रीय तिरंदाज

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खेळाडू घडण्यात अकादमींची भूमिका निर्णायक आहे. एकाच छत्राखाली सर्वसमावेशक प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अकादमीची स्थापना करणार आहे, असे आंतरराष्ट्रीय तिरंदाज लैश्राम बॉम्बयला देवीने सांगितले. आमच्या पिढीला जो त्रास झाला, तो नव्या खेळाडूंना होऊ नये ही यामागची भूमिका आहे, असेही तिने स्पष्ट केले. ‘स्पोर्ट्स फॉर ऑल’ उपक्रमाअंतर्गत बॉम्बयला युवा तिरंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईत आली आहे. तीन ऑलिम्पिकवाऱ्या, कोरियाची मक्तेदारी अशा विविध मुद्दय़ांवर ३१ वर्षीय अनुभवी तिरंदाज बॉम्बयलाशी केलेली खास बातचीत-

  • तिरंदाजीत पूर्वाचलातील खेळाडू मोठय़ा प्रमाणावर चमकताना दिसतात. यामागचे कारण काय? तुला कसा पाठिंबा मिळाला?

पूर्वाचलात शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर खेळांना मोठय़ा प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाते. अभ्यासाचा दबाव टाकला जात नाही. माझी आई तिरंदाजी प्रशिक्षक आहे. वडील राज्य हँडबॉल प्रशिक्षक आहेत. त्यामुळे खेळाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. आईबरोबर तिरंदाजीचा सराव तसेच सामने पाहायला जात असे. पण तांत्रिक माहिती नव्हती. भारतीय धनुष्यबाणानेच खेळाडू खेळत असत. रिकव्‍‌र्ह ठाऊकही नव्हते. शास्त्रोक्त प्रशिक्षणाला सुरुवात झाली. मात्र कंटाळवाणे आणि रूक्ष वाटल्यामुळे शालेय वयात तिरंदाजी सोडूनही दिले. नववीत असताना तिरंदाजीमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार शाळेकडून आली होती. वडिलांनी पाठिंबा दिला. दहावीच्या परीक्षेच्या वेळी पुन्हा तिरंदाजीकडे दुर्लक्ष झाले, परीक्षा दिली आणि पुन्हा खेळायला सुरुवात केली. अभ्यास आणि तिरंदाजी हा समतोल नेहमीच साधला. अलीकडे खूप शाळांमध्ये तिरंदाजी खेळ खेळला जातो. सरावाला संधी मिळते. शाळेकडून प्रोत्साहन मिळत असल्यामुळे युवा खेळाडूंसाठी सकारात्मक गोष्ट आहे.

  • ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हीच खडतर प्रक्रिया असते. तू तीन ऑलिम्पिकवारी केल्या आहेस. भारतीय तिरंदाज पदकाचे दावेदार असतात. मात्र पदक हुलकावणी का देते?

ऑलिम्पिक नाव उच्चारताच गोष्टी बदलतात आणि दडपण येते. तिरंदाजीची उपकरणे खर्चिक असतात. अकादमी वाढल्यास खेळाडूंना सहज खेळता येईल. विश्वचषक आणि ऑलिम्पिक विशेष फरक नसतो. बीजिंगमध्ये मी पहिल्यांदाच सहभागी होत होते. लंडनमध्ये आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. रिओमध्ये पदकासाठी आम्ही पदकाच्या शर्यतीत होतो. मात्र अगदी निसटत्या फरकाने पिछाडीवर पडलो आणि पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य खेळाडूंच्या तुलनेत मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात आम्ही कमी पडलो. तिरंदाज बाह्य़ वातावरणात खेळला जाणारा खेळ आहे. बाण सोडल्यानंतर लक्ष्यभेद होईपर्यंत वाऱ्याची दिशा, तापमान, पाऊस अशा अनेक गोष्टी तुमचे यश ठरवतात. या गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही. नशिबाची साथ मिळणेही महत्त्वाचे असते. क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च स्पर्धेत खेळण्याचे दडपण हाताळण्याची आमची पद्धत चुकली. प्रत्येक ऑलिम्पिक पुढच्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी प्रेरणा देते. पदक किंवा अव्वल स्थान नसेल तरी सर्वोच्च दर्जाच्या या स्पर्धेत खेळण्यासाठी मी आतुर आहे. टोकियो येथे होणाऱ्या २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तिरंदाजीत वयाचे बंधन नसते. त्यामुळे काहीच अडचण नाही.

  • ज्याप्रमाणे बॅडमिंटनमध्ये चीन सत्ताकेंद्र आहे. तसेच तिरंदाजीत कोरियाची मक्तेदारी आहे. या यशाचे रहस्य काय?

व्यवस्था हीच कोरियाची मोठी ताकद आहे. स्पर्धाच्या निमित्ताने कोरियात जाणे होते. एखाद्या छोटय़ा शहरातल्या शाळेत एक हजार मुले तिरंदाजी खेळतात. त्यांना घडवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रशिक्षकांची फौज तैनात असते. उपकरणे मुबलक प्रमाणावर असतात. खेळाडूंना फक्त खेळणे एवढेच काम करायचे असते. शाळा, महाविद्यालये तसेच सरकारद्वारे खेळांना, खेळाडूंना प्रचंड प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाते. आपल्याकडे प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो. उपकरणांची जुळवाजुळव करण्यात पैसा खर्च होतो. ऑलिम्पिक खेळांबाबत आता जागरूकता वाढली आहे, मात्र आधी तिरंदाजी हा शास्त्रोक्त खेळ आहे, याचीही अनेकांना कल्पना नव्हती. तिरंदाजी उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकत नव्हते. आपल्याकडे ऑलिम्पिक पदक पटकावल्यावर कौतुकाचा वर्षांव होतो. मात्र खेळाडू घडत असतानाचे जगणे जिकिरीचे असते. अन्य खेळातल्या खेळाडूंना लोक ओळखतात. त्यांच्या नावाला वलय आहे. तिरंदाजांचे तसे नाही. त्यामुळे जाहिराती, सदिच्छादूत यापासून तिरंदाज दूरच राहतात. परिस्थितीशी लढण्यातच बराच वेळ जात असल्याने खेळावर परिणाम होतो.

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेले क्रीडापटू स्वत:ची अकादमी स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असतात. तिरंदाजीचा प्रदीर्घ अनुभव तुझ्याकडे आहे. याचा उपयोग युवा तिरंदाजांना होणार का?

नक्कीच. अकादमीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नोंदणी केली आहे. बॉक्सिंगपटू मेरी कोमने अकादमी उभारली आहे. त्याच धर्तीवर मणिपूर शहरातच अकादमी उभारण्याचा मानस आहे. अकादमीमुळे खेळाची उपकरणे, व्यायामशाळा, आहारतज्ज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ, प्रशिक्षक अशा सर्वसमावेशक गोष्टी एकाच छत्राखाली उपलब्ध होतील. मी गेली १५ वर्षे तिरंदाजी खेळते आहे. आमच्या पिढीला ज्या त्रासाला, उणिवांना सामोरे जावे लागले त्या गोष्टींचा युवा पिढीला सामना करायला लागू नये हा अकादमीमागचा विचार आहे. देशात सध्या जमशेदपूरस्थित टाटा अकादमी तिरंदाज घडवण्याचे काम करते आहे. मात्र भौगौलिक अंतरामुळे तिथे जाऊन निवासी प्रशिक्षण घेणे प्रत्येकाला शक्य नाही आणि अकादमीच्या विद्यार्थीसंख्येला मर्यादा आहेत. मणिपूरमध्ये अशी अकादमी निर्माण झाल्यास किमान पूर्वाचलातील तिरंदाजांना अभ्यासकेंद्र म्हणून उपयुक्त ठरेल. सरावशिबिरे, स्पर्धा, प्रवास यामुळे मी व्यस्त आहे. अकादमीसाठी जागेची उपलब्धता, कायदेशीर मान्यता यासंदर्भात जुळवाजुळव माझे कुटुंबीय करत आहेत. निवृत्त झाल्यावर मी अकादमीसाठी पूर्णवेळ देऊ शकेन.

  • तुझ्या नावाविषयी बऱ्याच जणांना कुतूहल आहे. त्याविषयी काय सांगशील?

बॉम्बयला नावामुळे अनेक जण गोंधळतात. बॉम्बे अर्थात मुंबईची आहेस का, असे विचारतात. पाळण्यातले माझे नाव वेगळे होते. ते आईने ठेवले होते. शाळेत प्रवेश घेताना वडिलांनी हे नाव लिहिले. मात्र त्या नावामागचे कारण मलाही ठाऊक नाही. परंतु नावापेक्षा कर्तृत्वाने लक्षात राहिले तर अधिक आवडेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombayla devi laishram