महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा
पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण ही आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती जोडी प्रमुख आकर्षण ठरेल, अशी घोषणा स्पर्धेच्या संयोजकांनी आज केली.
एटीपी टूरच्या आगामी हंगामात आपण एकत्रितपणे खेळणार असल्याचे या जोडीने नुकतेच जाहीर केले आहे. पुण्यातील स्पर्धेसाठी या जोडीला पुरुष दुहेरीत अग्रमानांकन देण्यात आले आहे.
एटीपी दुहेरी क्रमवारीत शरणने कारकीर्दीतील सर्वोत्तम अशा ३६व्या स्थानावर झेप घेतली आहे. या स्पर्धेत पुणेकर टेनिस शौकिनांना मार्सेल व ग्रेरार्ड या ग्रेनॉलर्स बंधूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे.
मार्सेल हा दुहेरी क्रमवारीतील सर्वोच्च स्थानावरील खेळाडूसुद्धा आहे. मागील वर्षी पुरव राजाच्या साथीने खेळलेल्या लिएण्डर पेसने यंदाच्या स्पर्धेत मेक्सिकोच्या निगेल एंजेल रेयेस-व्हेरेला याच्याबरोबर, तर बोपन्नासोबत खेळलेला जीवन नेदुचेझियन यावर्षी जागतिक क्रमवारीत ६५व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या निकोलस मनरोशीसोबत खेळणार आहे.