Border Gavaskar Trophy History: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धा येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना ॲडलेडमध्ये, तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये, चौथा मेलबर्नमध्ये आणि शेवटचा सामना सिडनीमध्ये होणार आहे. याचबरोबर दुसरा कसोटी सामना हा पिंक बॉल कसोटी सामना असणार आहे. पण हा कसोटी सामना कधीपासून सुरूवात झाला आणि या ट्रॉफीला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नाव का पडलं, जाणून घेऊया.
गेल्या काही वर्षांमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या रोमांचक सामन्यांनी क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. जसजसा काळ पुढे सरकत गेला तशी या दोन्ही संघांमधील ही स्पर्धा अधिक अटीतटीची होत गेली. या कसोटी मालिकेला १९९६ मध्ये सुरूवात झाली आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे नाव देण्यात आले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत आतापर्यंत एकूण ५६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये भारताचा संघ कायमच वरचढ राहिला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ सामने जिंकले आहेत, २० सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत आणि १२ सामने अनिर्णित राहिले आहेत.
बॉर्डर-गावस्कर मालिकेला कधीपासून सुरूवात झाली?
१९९६ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डर यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू केली. बॉर्डर आणि गावस्कर हे दोन खेळाडू आपापल्या संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू होते आणि हा विक्रम त्यांच्या नावावर दीर्घकाळ कायम होता.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत आतापर्यंत १६ मालिका खेळवल्या गेल्या आहेत. भारतात ९ वेळा आणि ऑस्ट्रेलियात ७ वेळा या मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताने १० मालिका जिंकल्या असून ऑस्ट्रेलियाने ५ मालिका जिंकल्या आहेत. २००३-०४ मध्ये खेळवली गेलेली ही कसोटी मालिका अनिर्णित राहिली, जी मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली होती.
बॉर्डर गावस्कर मालिकेत भारताचा दबदबा
ऑस्ट्रेलियाने २०१४ मध्ये भारताला अखेरच्या वेळेस कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर भारताने पुढील ४ बॉर्डर-गावस्कर मालिकेवर आपले नाव कोरले आहे. २०१७ मध्ये भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला होता. यानंतर, २०१८-१९ मध्ये, त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २-१ ने मालिका जिंकली. त्यानंतर २०२०-२१ मध्ये भारताने पुन्हा ऑस्ट्रेलियन भूमीवर मालिका जिंकली. भारताने शेवटची मालिका २-१ ने २०२३ मध्ये जिंकली होती.