वृत्तसंस्था, सिडनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक पाचव्या सामन्यातील पराभवामुळे प्रतिष्ठेचा बॉर्डर-गावस्कर करंडक गमावण्यासह भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय अनिवार्य होता. मात्र, सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या (एससीजी) गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही.
ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकताना दशकभरानंतर बॉर्डर-गावस्कर करंडक उंचावला. यासह ऑस्ट्रेलियाने ११ ते १५ जून या कालावधीत इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठीही पात्रता मिळवली. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतील गतविजेते असून यंदा त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.
‘डब्ल्यूटीसी’मध्ये दक्षिण आफ्रिकेची गुणांची टक्केवारी ६६.६७ अशी असून ते अग्रस्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ ६३.७३ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. सिडनीतील पराभवामुळे भारतीय संघाचे गुणांकन ५० टक्क्यांवर घसरले.
गतवर्षीच्या अखेरीस मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्यासाठी सुस्थितीत होता. मात्र, न्यूझीलंडने भारताला ०-३ अशी धूळ चारली. त्यामुळे अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून न राहता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत किमान चार सामने जिंकावे लागणार होते. भारताने या मालिकेची विजयासह सुरुवात केली, पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. भारतीय संघाने पुढील चारपैकी तीन सामने गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अधुरेच राहिले.
गेल्या दोन पर्वांत भारताला अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’च्या नव्या पर्वाला सुरुवात करेल.