Border Gavaskar Trophy Sanjay Manjrekar statement on Virat and Rohit : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणारा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाला मोठा इशारा दिला आहे. संजय मांजरेकर यांनी विराट-रोहितबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलिया हा सध्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहे, पण भारताकडेही या जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. २०१४-१५ च्या मोसमापासून ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यावेळीही भारताचा ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा प्रयत्न असेल.

संजय मांजरेकर काय म्हणाले?

भारताची नजर ऑस्ट्रेलियात सलग तिसरी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याकडे असेल, परंतु संजय मांजरेकर यांना विश्वास आहे की रोहित शर्मा आणि कंपनीसाठी गोष्टी सोप्या नसतील. माजी क्रिकेटपटू ते समालोचक मांजरेकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे संघाचे कमकुवत दुवे असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की हे दोन्ही दिग्गज फलंदाज आता त्यांच्या फॉर्ममध्ये नाहीत. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या युवांबद्दल बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, या दोघांनाही संधीचं सोनं करावं लागेल. यानंतर त्याने ऋषभ पंत हा भारतीय संघातील एकमेव खेळाडू आहे जो सध्या फॉर्मात आहे.

रोहित-कोहली त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीत –

‘स्पोर्टीफाई विद पीआरजी’वर बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, ‘हे अवघड ठरु शकते. कारण विराट आणि रोहित दोघेही आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीत. ते त्यांच्या क्षमतेच्या शिखरावर नाहीत आणि यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल सारख्या इतर खेळाडूंना या संधीचा फायदा घेत स्वतःला सिद्ध करावे लागेल. माझ्या मते ऋषभ पंत हा एकमेव खेळाडू आहे जो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे आणि तो खूप महत्त्वाचा खेळाडू आहे.’

हेही वाचा – PAK vs ENG : ‘पाकिस्तानने कसोटी क्रिकेट खेळणे बंद करावे…’, इंग्लडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर लाइव्ह शोमध्ये संतापला

बांगलादेशविरुद्ध नुकत्याच संपलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोहली आणि रोहित दोघेही धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसले. रोहितने आक्रमक फलंदाजी केली, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. त्याला मालिकेत त्याला केवळ ४२ धावा करता आल्या, तर दुसरीकडे कोहलीने चार डावात ९९ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीबाबत मांजरेकर म्हणाले की, ‘हा विभाग पूर्णपणे संघटित दिसतो. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघात पूर्वीसारखी चमक दिसत नाही. भारतीय संघ अजूनही बऱ्यापैकी स्थिर आहे, पण कांगारू संघाचा विचार केला तर तो संघ पूर्वीसारखा दिसत नाही. पूर्वी तो चॅम्पियनसारखा दिसायचा आणि खेळायचा, पण आता तसं नाही.’ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होणार आहे.