जगज्जेता टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला जर्मनीचे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू बोरीस बेकर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेपूर्वी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जोकोव्हिचला मिळणार आहे. बेकर यांच्यासारख्या महान खेळाडूंचे मार्गदर्शन मला मिळणार असल्यामुळे मी अतिशय आनंदी झालो आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मला आगामी ग्रँड स्लॅम स्पर्धासाठी निश्चितपणे होणार आहे. त्यांच्याकडून शिकण्यासाठी मी उत्सुक झालो आहे असे जोकोव्हिचने सांगितले. ग्रँड स्लॅममध्ये सहा विजेतेपदे मिळविणाऱ्या बेकर यांनी सांगितले, जोकोव्हिचसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूचा प्रशिक्षक होण्याचे भाग्य मला लाभणार आहे. त्याला सर्वोत्तम यश मिळवून देण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. आम्ही एकत्रितरीत्या त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी झगडणार आहोत. जोकोव्हिचच्या मार्गदर्शक फळीत मरियन वाजदा, मिलजान अमानोविक व गेभार्ड फिलग्रिश्ट यांचा समावेश असून त्यांना बेकर जाऊन मिळणार आहे. बेकर यांच्या नियुक्तीबद्दल वाजदा यांनी आनंद व्यक्त करीत सांगितले, जोकोव्हिचचा निर्णय योग्यच आहे. त्याला अव्वल दर्जाच्या खेळाडूंचे मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचा सल्ला मी अनेक वेळा दिला होता. आता त्यास मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे.

Story img Loader