कुठल्याही नव्या गोष्टीची सुरुवात, पदार्पण म्हटले की हुरहुर, दडपण असतेच. हे पदार्पण फुटबॉलच्या कुंभमेळ्यात खेळण्याचे असेल तर खेळाडूंच्या मनस्थितीची केवळ कल्पनाच केलेली बरी. बोस्निया आणि हझ्रेगोविना असे प्रचंड नाव असलेला हा संघ विश्वचषकाच्या पटलावर पहिल्यांदाच नशीब अजमावणार आहे. १९९२ मध्ये युगोस्लाव्हियाचा भाग असलेला हा प्रांत स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला आला. मात्र फुटबॉलचे बीज आधीपासूनच संस्कृतीत मुरलेले होते, म्हणूनच काही खेळाडूंना युगोल्साव्हिया तर काहींना क्रोएशियाकडून खेळण्याचा अनुभव आहे. या अनुभवाची शिदोरी बोस्नियाचे प्रतिनिधित्व त्यांना उपयोगी पडणार आहे.
पहिल्यांदाच विश्वचषक वारी करणाऱ्या संघांना इथपर्यंत मजल मारणेच अभिमानास्पद वाटू शकते, पण बोस्नियाला त्यापल्याडचा विचार करायचा आहे. इडन झेको आणि वेदाद इबिसेव्हिक या जोडीने पात्रता फेरीत संघाच्या ३० पैकी १८ गोल केले होते. विश्वचषकात तगडय़ा संघांविरुद्घ या जोडीकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी या जोडगोळीला मिरालेम पजनिक, सेनाद ल्युकिक आणि सेजाद सेएलहोव्हिक त्रिकुटाची साथ मिळणे आवश्यक आहे.
५९ वर्षीय साफेट सुकिक यांचा अनुभव बोस्नियाच्या वाटचालीत निर्णायक ठरणार आहे. युगोस्लाव्हियाचे प्रतिनिधित्व करताना शानदार प्रदर्शन करणाऱ्या सुकिक यांना संघाला शिस्तीचे धडेही द्यावे लागणार आहेत. झेको तसेच इमीर स्पाहिक या प्रमुख खेळाडूंना रागावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. पात्रता फेरीच्या लढतींमध्ये सुकिक यांचे डावपेच न पटल्याने या दोघांनी राग व्यक्त केला होता. विश्वचषकात असे प्रकार संघात दुही माजवू शकतात. विश्वचषकात खेळणार असल्याने, पात्रता फेरीचा अडथळा पार करून मायदेशी आल्यानंतर राजधानी सॅराजेव्हो येथे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. मात्र या उत्साहाचे रूपांतर फाजील आत्मविश्वासात होऊ देऊ नका असा थेट इशारा सुकिक यांनी खेळाडूंना दिला आहे. खेळाडूंना वाईट वाटेल, लोकांना कदाचित माझे वागणे टोकाचे वाटेल, परंतु बोस्नियाच्या संघाला मी ब्राझीलच्या पर्यटनासाठी नेत नाहीये. या स्पर्धेचे गांभीर्य बाळगणे आवश्यक आहे असे सुकिक यांनी स्पष्ट केले.
बोस्निया आणि हेझ्रेगोविना (इ-गट)
*फिफा क्रमवारीतील स्थान : २५
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : पदार्पण (२०१४)
संभाव्य संघ
गोलरक्षक : अस्मिर बेगोव्हिक, अस्मिर अवडुकिक, देजान बँडोव्हिक, जस्मीन फेइझिक. बचाव फळी : इमीर स्पाहिक, मेंसूर मुजडझा, अवडिजा रासेजोव्हिक, ऑग्नजेन रांजेस, इर्मिन बाइककिक, मुहम्मद बेइसिक, इर्विन झुकानोव्हिक, टोनी सुनिजिक, सिड कोलासिनॅक, बोरिस पॅन्डझा. मधली फळी : व्हझदान मिसिमोव्हिक, मिरालेम पजनिक, सेनिजाद इबरिकिक, सेजाद सेएलहोव्हिक, हॅरिस मेंदूनजानिन, सेनाद ल्युकिक, अदनान झाहिरोव्हिक, मिरोस्लाव्ह स्टेव्हानोव्हिक, इडिन विस्का, इझेट हजरोव्हिक, झोरान क्वर्झिक, अनेल हाडझिक, टिनो स्वेन सुकिक, स्त्रादान स्टॅनिक, इल्विर राहिमिक, इव्हान सेसार. आघाडीची फळी : इडिन झेको, वेदाद इबिसेव्हिक, इर्मिन झेक.
* स्टार खेळाडू : इडिन झेको
* व्यूहरचना : ४-१-३-२
* प्रशिक्षक : साफेट सुकिक.
अपेक्षित कामगिरी
बोस्निया आणि हेझ्रेगोविनाचा समावेश असलेल्या ‘फ’ गटाची संरचना अनोखी आहे. बलाढय़ संघ असल्याने अर्जेटिनाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र बोस्निया-हझ्रेगोविना, इराण आणि नायजेरिया या तिघांमध्ये पुढील फेरीत आगेकूच करण्यासाठी जबरदस्त चुरस रंगणार आहे. विश्वचषकात खेळण्याची बोस्नियाची ही पहिलीच वेळ आहे. मात्र स्वतंत्र राष्ट्र होण्यापूर्वी या संघातले खेळाडू युगोस्लाव्हियाच्या संघाचा भाग असल्याने त्यांचे खेळाडू अनुनभवी नाहीत. बोस्नियाच्या खेळाडूंकडे युरोपातील विविध लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे नायजेरियाच्या आक्रमणाला ते चांगली टक्कर देऊ शकतात. इराणचा संघ सातत्यासाठी ओळखला जातो. त्यांना नमवण्यासाठी बोस्नियाला मेहनत करावी लागणार आहे. विश्वचषकासारख्या सर्वोच्च क्रीडा व्यासपाठीवर खेळण्याचे दडपण न घेता खेळ केल्यास बोस्निया ‘फ’ गटात आश्चर्यकारक निकालाची नोंद करू शकते. नुकताच आफ्रिकन देशांचा चषक जिंकलेल्या नायजेरियासमोर बोस्निया आणि हेझ्रेगोविनाची डाळ शिजणे कठीण आहे. त्याचबरोबर बलाढय़ इराणसमोरही त्यांचा निभाव लागणार नाही. त्यामुळे बोस्नियाचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता अधिक आहे.
बलस्थाने व कच्चे दुवे
आक्रमण हा चार अक्षरी शब्द बोस्नियाचा आधारस्तंभ आहे. प्रतिस्पर्धी संघ कितीही बलवान असो, त्यांचा बचाव भेदून दे दणादण गोल करण्यात बोस्नियाचे खेळाडू पटाईत आहेत. मोठय़ा प्रमाणावर गोल करण्याच्या कौशल्याचा त्यांना पात्रता फेरीत फायदा झाला होता. इराण आणि नायजेरियाविरुद्ध आक्रमणाचे हत्यार परजण्याचा त्यांचा मनसुबा आहे. गोल वाचवणे या मुद्यावर मात्र बोस्नियाला गृहपाठ करावा लागणार आहे. इडिन झेको हा मँचेस्टर सिटीचा अव्वल खेळाडू त्यांच्याकडे आहे. त्यामुळे बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिनाला त्याच्याच कामगिरीवर अधिक अवलंबून राहावे लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा