टीम साऊदी व ट्रेन्ट बोल्ट यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामना ५३ धावांनी जिंकला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळविला.
न्यूझीलंडने चौथ्या दिवसअखेरीस असलेल्या ७ बाद ३३१ धावांवर दुसरा डाव घोषित केला व विंडीजपुढे विजयासाठी ९० षटकांत ३०८ धावांचे आव्हान ठेवले. ख्रिस गेल (११) याच्यासह पहिले तीन फलंदाज तंबूत परतले, त्या वेळी विंडीजच्या ८१ धावा झाल्या  होत्या. शिवनरेन चंदरपॉल (२५), डॅरेन ब्राव्हो (४०), दिनेश रामदिन (२९) यांनी मधल्या फळीत दमदार खेळ करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जेसॉन होल्डरने ५२ धावांची खेळी करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते अपुरेच ठरले.
न्यूझीलंडकडून साऊदी, बोल्ट व मार्क क्रेग यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनने सामनावीर व मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार पटकावले.