ऑकलंडच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ गडी राखून मात केली. ५ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-० ने आघाडीवर आहे. लोकेश राहुलने या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजाने यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
अजय जाडेजाच्या मते गोलंदाजांनी दुसरा सामना जिंकवला. “प्रतिस्पर्धी संघ जिथे फक्त १३२ धावा बनवतो त्याठिकाणी गोलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार मिळायला हवा. सामना तुम्ही गोलंदाजांमुळेच जिंकला आहात, माझ्यामते रविंद्र जाडेजाला सामनावीराचा पुरस्कार मिळायला हवा होता. लोकेश राहुल केवळ नाबाद राहिला, कदाचीत याच कारणासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला असावा.” Cricbuzz संकेतस्थळाच्या कार्यक्रमात जाडेजा बोलत होता.
अवश्य वाचा – Ind vs NZ : जे पंतला जमलं नाही ते राहुलने करुन दाखवलं, केली धोनीशी बरोबरी
भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही जाडेजाच्या मताशी सहमती दर्शवली. “माझ्यामतेही गोलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार मिळायला हवा होता. प्रतिस्पर्धी संघाला १३० किंवा १४० धावांवर रोखणं याचा अर्थ तुमचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत.” सेहवागने आपलं मत मांडलं. रविंद्र जाडेजाने दुसऱ्या टी-२० सामन्यात ४ षटकात १८ धावा देत २ बळी घेतले.