खेळ आणि पैसा हे समीकरण कोणासाठीही नवीन नाही. विविध खेळ आणि त्यासाठी मिळणारे मानधन हे दिवसेंदिवस वाढत जात आहे. आयपीएल किंवा तत्सम फ्रँचाइजी पद्धतीवर आधारित स्पर्धा हे याचे उत्तम उदाहरण आहेत. भारतातील आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत स्पर्धा मानली जाते. याशिवाय फुटबॉल या खेळातील खेळाडूही मालामाल होताना दिसतात. पण नुकतेच या साऱ्या खेळांना आणि खेळाडूंना मागे टाकत एका खेळाडूने क्रीडा विश्वाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला आहे.
आतापर्यंत बरेच मोठे करार नामवंत खेळाडूने केले आहेत. पण हा करार मात्र ऐतिहासिक असल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे या कराराची किंमत. एका बॉक्सरशी तब्बल २६५९ कोटी रुपयांचा एका करार करण्यात आला आहे.
बॉक्सरचे नाव साऊल कॅनेलो अलव्हारेझने असून तो मॅक्सिकोचा खेळाडू आहे. या कराराबद्दल त्याने नुकताच खुलासा केला आहे. DAZN कंपनीबरोबर त्याने एक करार केला असून यासाठी त्याला २६५९ कोटी म्हणजेच सुमारे ३६५ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळणार आहे.य करारांतर्गत अल्वारेझ ११ लढती खेळणार आहे. १५ डिसेंबरपासून या लढती सुरु होणार आहेत.
यापूर्वी सर्वाधिक रक्कमेचा करार हा २०१४ साली झाला होता. अमेरिकेचा बेसबॉलपटू गिआनकार्लो स्टॅन्टोनने ३२५ मिलियन डॉलरचा हा करार केला होता.