उपांत्य फेरीत पंचांनी वादग्रस्त पद्धतीने हरवल्यामुळे उद्विग्न झालेली भारताची बॉक्सर एल. सरिता देवी हिने कांस्यपदक नाकारत संयोजक तसेच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिचे हे पदक संयोजकांकडे आहे. लाइटवेट (६० किलो) गटात सरिताने कोरियाच्या जीना पार्क हिच्यावर वर्चस्व गाजवले; पण पंचांनी पार्क हिच्या बाजूने कौल दिला. याविरोधात भारताने केलेली तक्रार आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने फेटाळून लावली होती. त्यामुळे बुधवारी झालेल्या पदक वितरण सोहळ्यावेळी सरिता देवीने पदक न स्वीकारता ते जीना पार्क हिला बहाल केले. त्यानंतर सरिता देवी रडत-रडत तिथून निघून गेली.
‘‘मला पदक स्वीकारायचे नव्हते, असे नाही; पण मी ते पदक स्वीकारून कोरियाच्या खेळाडूला बहाल केले. या स्मृती मनात कायम ठेवूनच मी माझी बॉक्सिंग कारकीर्द चालू ठेवणार आहे. पदक वितरण सोहळ्यादरम्यान मला जे वाटले, ते मी केले,’’ असे सरिता देवीने सांगितले. कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे सांगत हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळणाऱ्या भारतीय पदाधिकाऱ्यांवर तिने कडाडून टीका केली. ती म्हणाली, ‘‘मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. पंचांनी मला पराभूत केल्यानंतर एकाही भारतीय पदाधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क साधला नाही.’’
सरिताची एआयबीएकडून चौकशी होणार
पदक वितरण सोहळ्याप्रसंगी कांस्यपदक परत केल्यामुळे भारताची महिला बॉक्सर सरिता देवी हिला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सरिताला या कृत्यासाठी माफ करता येणार नाही, असे एआयबीएच्या निरीक्षकांनी म्हटले आहे. ‘‘एआयबीएने या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी शिस्तपालन समिती नेमली आहे. आशियाई स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या प्रकरणाचा निकाल लागेल,’’ असे एआयबीएच्या पत्रकात म्हटले आहे. एआयबीएचे निरीक्षक डेव्हिड फ्रान्सिस यांनी या प्रकरणाचा अहवाल आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडे पाठवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा