भारताच्या चार बॉक्सर्सनी अंतिम फेरीत धडक मारली, पण एकालाही सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही. बीजिंग ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंग यालाही अखेर रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. पुरुषांच्या मिडलवेट (७५ किलो) गटात विजेंदरला इंग्लंडच्या अँथोनी फावलर याच्याकडून ०-३ असे पराभूत व्हावे लागले.
भारताच्या चारपैकी किमान तीन बॉक्सर्सकडून सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगली जात होती. अनुभवी विजेंदर सिंगकडून भारताला किमान सुवर्णपदक मिळेल, अशी आशा होती. पण भारताचा अव्वल बॉक्सर फावलरच्या आक्रमणासमोर निष्प्रभ ठरला.
 भारताला बॉक्सिंगमध्ये चार रौप्य आणि एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विजेंदर, मनदीप जांगरा (६९ किलो) तसेच लैश्राम देवेंद्रो सिंग (४९ किलो) आणि लैश्राम सरिता देवी (महिला ६० किलो) यांनी अंतिम फेरीत पराभवाचा धक्का पचवत रौप्यपदक पटकावले. पिंकी जांगरा हिने महिलांच्या ५१ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले.
आपल्यापेक्षा सरस असलेल्या प्रतिस्पध्र्यासमोर विजेंदरचा खेळ उंचावला नाही. विजेंदरने आक्रमक खेळ केला नाही, पण त्याला प्रतिस्पध्र्याचा भक्कम बचाव भेदता आला नाही.
अँथोनीच्या अप्रतिम पंचेससमोर विजेंदर पहिल्या फेरीपासूनच माघारीवर पडला. दुसऱ्या फेरीतही अँथोनीने वर्चस्व गाजवले. तिसऱ्या फेरीत विजेंदरने जोमाने पुनरागमन केले. पण पहिल्या दोन फेरीतील निकालावरून पंचांनी अँथोनीला तिसऱ्या फेरीतही सरस ठरवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रौप्यपदक मुलाला समर्पित -विजेंदर
नवी दिल्ली : ‘‘अंतिम फेरीच्या लढतीला सुरुवात करण्याआधीच माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. प्रचंड वेदना होत असल्यामुळे मला पंचेस लगावताना कठीण जात होते. अखेरच्या फेरीत मी कडवी लढत दिली, पण दुखापतीमुळे प्रतिस्पध्र्याला माझ्यावर वरचढ होण्याची संधी मिळाली,’’ असे रौप्यपदक पटकावल्यानंतर विजेंदरने सांगितले. ‘‘सोमवारी माझ्या मुलाचा वाढदिवस असणार आहे. त्यामुळे हे रौप्यपदक मी मुलाला समर्पित करत आहे. सुवर्णपदक मिळवता आले असते, तर आनंद गगनात मावेनासा झाला असता. पण रौप्यपदकावर मी समाधानी असून माझे सर्वस्व असलेल्या मुलाला मी हे पदक समर्पित करतो,’’ असे विजेंदर म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boxer vijender singh settles for silver medal in the commonwealth games