महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष
बँकॉक येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांची ही कामगिरी प्रशंसनीय आहे. या युवा बॉक्सिंगपटूंनी जागतिक स्पध्रेची पात्रता मिळवून भारताच्या आशा उंचावल्या आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जय कवळी यांनी व्यक्त केले. ज्या घरात सतत भांडणे होतात आणि तेथील मुलांना अभ्यास करता येत नाही, अशा घरातील मुलांनी परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले आहे, असेही कवळी यांनी सांगितले. आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतील भारतीय बॉक्सिंगपटूंच्या कामगिरीच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत-
ल्ल आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का?
संघटनात्मक वाद देशात चालू असतानाही या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत चौथे स्थान पटकावून प्रशंसनीय कामगिरी केली आहे. दहा जणांचा चमू या स्पध्रेत दाखल झाला होता आणि त्यापैकी सहा जणांनी या स्पध्रेत उल्लेखनीय खेळ केला. एक रौप्य आणि तीन कांस्यपदके भारताच्या खात्यात जमा झाली.
ल्ल तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा विजेंदर सिंग प्रो बॉक्सिंगकडे वळल्यानंतर बॉक्सिंगमध्ये भारताच्या कामगिरीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. त्याला हे उत्तर म्हणावे का?
विजेंदर सिंग प्रो बॉक्सिंगकडे वळल्यानंतर भारतीय बॉक्सिंगबाबत प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात होते. त्यामुळे हा निकाल आश्वासक आहे. विजेंदरने तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ही खूप मोठी भरारी आहे. विजेंदर आणि अखिल कुमार यांच्या अनुपस्थितीत या युवा खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ज्या कमी सुविधांमध्ये आम्ही काम करत आहोत, त्यात मिळवलेले हे यश फार मोठे आहे.
ल्ल भारताला आशियाई स्पध्रेत याहून अधिक चांगली कामगिरी करता आली असती का?
नक्कीच, परंतु सध्याची परिस्थिती पाहता ही कामगिरी कौतुकास्पद आहे. बॉक्सिंगच्या हितसाठी आम्ही काम करत आहोत. मी, किशन नरसी आणि गुरबक्ष सिंग संधू आम्ही तिघेही काम करतोय. सरकारचाही आम्हाला पाठिंबा आहे. खेळाडूंना आणखी योग्य सुविधा मिळाल्या असत्या, तर याहून चांगला निकाल लागला असता. संघटनात्मक वादामुळे सध्या भारतात बॉक्सिंग स्पर्धा होत नाहीत. त्याचा फटका बसला, असे म्हणायला हरकत नाही. जागतिक स्पध्रेत या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी याकरिता आम्ही सर्वतोपरी काम करतोय. त्यांना चांगल्यात चांगली सुविधा मिळवून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. शेवटी या स्पध्रेत जगातील अव्वल खेळाडू सहभागी होणार असल्याने भारतासमोर खडतर आव्हान आहे.
ल्ल जागतिक स्पध्रेतील आव्हान पाहता, किती भारतीय खेळाडू पदक पटकावू शकतील?
जागतिक स्पध्रेत पदक मिळवणे हा बहुमान आहेत. पण हा ऑलिम्पिकचा दरवाजा आहे. सहा जण जागतिक स्पध्रेसाठी पात्र ठरले आहेत आणि या सर्वानी ऑलिम्पिक प्रवेश मिळवल्यास आनंद होईल. मात्र यापैकी चौघांनीही ऑलिम्पिक पात्रता मिळवल्यास भारतासाठी खूप मोठी गोष्ट ठरेल. गेल्या ऑलिम्पिकला सात बॉक्सिंगपटू खेळले होते. मात्र आता नियम बदलले आहेत, त्यामुळे बॉक्सिंगमधील आव्हाने वाढली आहेत. तसेच पात्रता फेरीच्या प्रक्रियेतही बदल झाल्याने आशियाई देशांचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. मनोज कुमार, देवेंद्रो सिंग, शिवा थापा आणि विकास कृष्णन यांच्याकडून जागतिक स्पध्रेत मला फार आशा आहेत.