आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान मुष्टियोद्धा मोहम्मद अली यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. अली यांच्यावर फिनिक्स येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती अली यांचे प्रवक्ता बाबा गुनेल यांनी एनबीसी न्यूजला दिली. कालपासूनच त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे ऐकायला मिळत होते. अली यांना श्वसनाचा विकार होता. पार्किन्सनमुळे त्यांचा हा त्रास अधिकच जटील झाल्याने ते मृत्यूशय्येवर असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात आले होते. गेली अनेक वर्षे अली पार्किन्सनने आजारी होते. मुष्टियुद्धमधील महान खेळाडू अली यांनी हेवीवेट चॅम्पियन म्हणून ओळख होती. अली यांनी ऑलिंपिकमध्ये मुष्टियुद्ध खेळात सुवर्णपदक मिळविले होते.
अली यांच्या नावावर तीनवेळा जागतिक हेवीवेट चॅम्पियन होण्याचा विक्रम आहे. याशिवाय, २०व्या शतकातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला होता. बॉक्सिंगच्या जगभरातील चाहत्यांना मोहम्मद अली या नावाने एकेकाळी प्रचंड वेड लावले होते. बॉक्सिंग रिंगमधील त्यांच्या चपळ हालचाली आणि ठोसेबाजीचे वर्णन ‘फुलपाखरासारखं तरंगणं आणि मधमाशीसारखा अकस्मात डंख मारणं’, असे केले जात असे. ‘द ग्रेटेस्ट’ या टोपणनावाने ओळखल्या जाणारे मोहम्मद अली यांनी १९८१ साली बॉक्सिंगला अलविदा केला होता. त्यांच्या नावावर ५६ विजय असून त्यापैकी ३७ लढतींमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्याला नॉकआऊट केले होते. अली यांना केवळ पाचवेळा पराभव स्विकारावा लागला होता. सोनी लिस्टन, जो फ्रेझर आणि जॉर्ज फोरमन यांच्यासारख्या प्रसिद्ध मुष्टियोद्ध्यांबरोबरच्या अली यांच्या लढती जागतिक पातळीवर चांगल्याच गाजल्या. याशिवाय, १९६० साली धार्मिक कारणांमुळे अमेरिकी सैन्यात सामील होण्यास नकार दिल्यामुळे अली हे कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्याचे प्रतिक बनले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा